राणीच्या बागेतील वाहनधारकांचे प्राणीदर्शन महागले! वाहनतळ शुल्कात चारपट वाढ

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयातील पार्किंग शुल्कात थेट चारपट वाढ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
राणीच्या बागेतील वाहनधारकांचे प्राणीदर्शन महागले! वाहनतळ शुल्कात चारपट वाढ
Published on

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयातील पार्किंग शुल्कात थेट चारपट वाढ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे चारचाकी वाहनांना २० रुपयाऐवजी ८० रुपये, तर दुचाकीस्वारांना १० रुपयांऐवजी ३० रुपये मोजावे लागणार आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. राणी बागेत दररोज ८ ते १० हजार पर्यटक येत असतात. राणी बागेत अनेक पर्यटक आपली वाहने घेऊन येतात.

पर्यटकांना वाहन पार्किंगसाठी राणी बागेत जागा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र वाहन पार्किंगसाठी आता जादा शुल्क आकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे राणी बागेत पशुपक्ष्यांची धमाल अनुभवण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता वाहन पार्किंगसाठी जादा शुल्क मोजावे लागणार आहे. पालिकेच्या उद्यान व प्राणी संग्रहालयाच्या प्रवेशद्वारामधून परिसरातील दुकानदारही वाहने आणून लावतात. कालावधीच्या तुलनेत जमा रक्कम कमी असल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान होते. काहींमार्फत पार्किंगचा गैरफायदा घेतला जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळेच दरवाढ करण्यात आल्याचे प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

भाऊ दाजी लाड संग्रहालयही महागले

उद्यान व प्राणी संग्रहालयाला लागून असलेल्या ऐतिहासिक भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या तिकीट दरातही वाढ करण्यात आली आहे. यामध्ये लहान मुलांसाठी असणारे पाच रुपयांचे तिकीट १० रुपये, तर प्रौढांसाठी असणारे १० रुपयांचे तिकीट २० रुपये करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in