जामिनावर बाहेर आलेली अनिक्षा 'नॉट रिचेबल'; अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात आरोपी

अनिक्षाला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यासाठी मुंबईच्या भायखळा कारागृहात पाठवण्यात आले होते, पण जामिनावर झाली सुटका
जामिनावर बाहेर आलेली अनिक्षा 'नॉट रिचेबल'; अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात आरोपी
Published on

अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानी तुरुंगातून सुटल्यानंतर उल्हासनगर येथील तिच्या घरी परतली नाही. त्यामुळे तपास आणि प्रसारमाध्यमांना टाळण्यासाठी अनिक्षा अज्ञातस्थळी रवाना झाल्याची शक्यता आहे. जामीन मिळाल्यानंतर अनिक्षाची तुरुंगातून सुटका झाली. अनिक्षाला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यासाठी मुंबईच्या भायखळा कारागृहात पाठवण्यात आलं होतं.

काय आहे नेमकं प्रकरण ?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बुकी अनिल जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिला १६ मार्च रोजी उल्हासनगर येथून अटक केली होती. यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. अनिक्षाला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यासाठी मुंबईच्या भायखळा कारागृहात पाठवण्यात आलं होतं. ही न्यायालयीन कोठडी आता संपली आहे. २७ मार्च रोजी मुंबई सत्र न्यायालयाने अनिक्षाला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

अनिक्षाच्या वकिलांनी काय केला युक्तिवाद

अनिक्षाचा ब्लॅकमेलिंग प्रकरणात थेट सहभाग नाही. अनिक्षाचे अमृता फडणवीससोबतचे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. अनिक्षाला राजकीय कारणावरून या प्रकरणात ओढण्यात आले आहे. यानंतर न्यायालयाने अनिक्षाला जामीन मंजूर केला. त्यानंतर काल तिची भायखळा कारागृहातून सुटका झाली.

कारागृहातून सुटल्यानंतर ती अनिक्षाला ज्या घरी अटक करण्यात आली होती, त्या घरी परतण्याची शक्यता होती. मात्र प्रत्यक्षात अनिक्षा उल्हासनगर येथील तिच्या घरी परतलीच नाही. अनिक्षा अज्ञातस्थळी निघून गेली असण्याची शक्यता आहे. उल्हासनगरमधील कॅम्प १ परिसरातील मायापुरी अपार्टमेंटमध्ये अनिक्षा फ्लॅट क्रमांक ८०१ मध्ये राहत होती. मात्र या फ्लॅटला अजूनही कुलूपच आहे. त्यामुळे तपास आणि प्रसारमाध्यमांपासून वाचण्यासाठी अनिक्षा अज्ञातस्थळी निघून गेल्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in