गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; अंजली दमानिया आक्रमक, डान्स बार योगेश कदम यांच्या आईच्याच नावे

कांदिवलीतील सावली डान्स बार हा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने आहे. कोणाला चालवायला दिला नसून याठिकाणी नोकर कामाला आहेत. या बार मध्ये नियम धाब्यावर बसवून सगळे सुरू होते, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : कांदिवलीतील सावली डान्स बार हा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने आहे. कोणाला चालवायला दिला नसून याठिकाणी नोकर कामाला आहेत. या बार मध्ये नियम धाब्यावर बसवून सगळे सुरू होते, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. बुधवारी सावली डान्स बारची पहाणी केल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने कांदिवलीत डान्स बार असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार विधान परिषदेचे सदस्य अनिल परब यांनी केल्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

त्यात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने कांदिवली तील डान्स बार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

मी कधीही कोणतेही प्रकरण घेताना कागदपत्रे, पुरावे गोळा केल्याशिवाय पुढे जात नाही. आज बारची प्रत्यक्ष पाहणी केली असून त्यातील गैरप्रकार समजून घेतला. आमदार अनिल परब यांनी केलेल्या आरोपानुसार वस्तुस्थिती सध्या खरी आहे. त्यामुळे समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तिथे परवान्याची प्रत, व्हिडीओ पुरावे घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एफआयआरमध्ये नमूद केलेल्या गोष्टींचाही उल्लेख करताना डान्स बारवर ११.१० वाजता धाड टाकली, त्यावेळी २२ महिला सापडल्या. दरम्यान, स्टेजच्या खाली काही महिला ग्राहकांसोबत बसलेल्या होत्या. यावेळी सर्व अटी- शर्तींचे उल्लंघन होत होते, असा दावा केला.

कोणत्याही राजकीय पक्षाशी मी संबंधित नाही. परंतु, एक सामान्य नागरिक म्हणून माझ्या राज्याचे गृहराज्यमंत्री जर स्वतःच्या बारमध्ये अशा बेकायदेशीर काम करणार असतील, तर हे सुसंस्कृत राज्यात अत्यंत दुर्दैवी असून दमानिया यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

बारची जबाबदारी घरच्यांचीच

गृहराज्यमंत्री कदम यांनी डान्सबार नव्हे तर ऑर्केस्ट्रा असल्याचा यापूर्वी दावा केला होता. मात्र व्हिडीओ, पुरावे आणि पोलिसांचा अहवालानुसार तो फोल ठरतो. दुसरीकडे कदम कुटुंबीय म्हणतात बार एक शेट्टी नावाचा व्यक्ती चालवत होता, परंतु परवाना त्यांच्या आईच्या नावे असून तेथील सर्व नोकरदार व्यक्ती तिथे केवळ कार्यरत होत्या. म्हणजेच बार चालवण्याची जबाबदारी घरच्यांची होती. त्यामुळे असे गृहराज्यमंत्री महाराष्ट्राला नकोत, असा थेट इशारा दमानिया यांनी देत कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

logo
marathi.freepressjournal.in