
मुंबई : महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका होत असताना महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचे समर्थन केले आहे. पवारांचा संबंधित अधिकाऱ्याला केलेला फोन चुकीच्या अर्थाने घेतला जात असल्याचे शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले.
आपल्याला अनेकदा नेमके काय चाललेय हे माहीत नसते. कधी अधिकाऱ्यांचे म्हणणे असते की काम बेकायदेशीर आहे, तर कार्यकर्ते म्हणतात की ते कायदेशीर आहे. अशा प्रकारे वाद निर्माण होतो. अजित पवार हे कधीही कोणत्याही बेकायदेशीर कामासाठी झापतील असे मला वाटत नाही. मला वाटते की त्यांनी फक्त पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळावा म्हणून फोन केला असावा, आणि त्यांना हे माहीत नसेल की तो खाणकाम बेकायदेशीर आहे, असे बावनकुळे म्हणाले.