ठाकरे गटाला आणखी एक धक्का ; तीन माजी नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला

आतापर्यंत ३३ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात जाहीररित्या प्रवेश केला आहे
ठाकरे गटाला आणखी एक धक्का ; तीन माजी नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला
Published on

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लागलेली गळती काही केल्या कमी होताना दिसत नाही. अशातच आता शिवसेना ठाकरे गटातील तीन माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटाच्या कोटात एकच खळबळ उडाली आहे.

आतापर्यंत ३३ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात जाहीररित्या प्रवेश केला आहे आणि येणाऱ्या काळात आणखी काही माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचा शिंगे गटाचा प्रयत्न असल्याचं सगळीकडे बोलले जातं आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे ( शिवसेना )गटाच्या तीन माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे . यामध्ये जोगेश्वरीतील प्रभाग क्रमांक ७३चे माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे आणि प्रभाग क्रमांक ८८च्या माजी नगरसेविका स्नेहल शिंदे यांचा समावेश आहे.

जोगेश्वरी, वर्सोवा आणि विलेपार्ले या विभागातील १००हून अधिक पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटांत प्रवेश केला होता. या सर्वांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात जोरदार स्वागत करत त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या होत्या . भाजप-शिवसेना सत्तेत आल्यापासून मुंबईत आणि अनेक ठिकाणी विकासकामे वेगाने सुरू झाली आहेत . त्यामुळे आता मुंबईला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं.

logo
marathi.freepressjournal.in