‘इसिस’च्या आणखी एकाला अटक

अटक केलेला अकिब हा शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला या दोघांना आर्थिक मदत करत असल्याचे तपासात समोर आले होते
‘इसिस’च्या आणखी एकाला अटक

भिवंडी : एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली गावात शुक्रवारी छापेमारी करत आणखी एका ‘इसिस’ दहशतवादी संघटनेच्या संशयित आरोपीला अटक केली आहे. शमील साकिब नाचण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, १० दिवसांपूर्वीच अटक केलेल्या आरोपीचा नातेवाईक अकिब नाचणलाही याच परिसरातून अटक केली होती, तर गेल्याच महिन्यात याच परिसरातून शरजील शेख (३५) आणि झुल्फिकार अली बडोदावाला (३६) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवलीमधून आतापर्यंत चौघे जण दहशतवादी कारवाईत सहभाग असल्याचे समोर आले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या पथकाने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अचानक धाड टाकली होती. यात शमीलला ताब्यात घेण्यात आले. शमील हा दहशतवादी कृत्यांसाठी इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइसची निर्मिती, प्रशिक्षण आणि बॉम्ब बनवून त्याची चाचणी करत असल्याचे समोर आले होते. तो यापूर्वी अटक केलेल्या अकिब नाचण, जुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी आणि अब्दुल कादिर पठाण आणि इतर काही संशयितांसह इतर पाच आरोपींच्या सहकार्याने काम करत होता. यापूर्वी अटक केलेला अकिब हा शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला या दोघांना आर्थिक मदत करत असल्याचे तपासात समोर आले होते.

logo
marathi.freepressjournal.in