पालिकेचा आणखी एक अधिकारी पीएचडी पदवीधर

करनिर्धारण व संकलन विभागातील अजय लोखंडे यांचे यश
पालिकेचा आणखी एक अधिकारी पीएचडी पदवीधर

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागातील आपली जबाबदारी चोखपणे सांभाळत अजय लोखंडे यांनी पीएच पदवी प्राप्त केली आहे. कर निर्धारण व संकलन विभागासह मुंबई महापालिकेतील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची साथ मिळाल्याने हे शक्य झाले, असे सांगत त्यांनी सगळ्यांचे आभार मानले आहेत.

१ फेब्रुवारी १९९६ रोजी मुंबई महानगरपालिकेत सुरक्षारक्षक म्हणून नेमणूक झाली. त्यावेळी ते बी.ए. (ग्रामीण विकास) पदवीधर होते. शिक्षणाची आवड असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे नोकरी करत असताना १९९८ मध्ये एम.ए. (ग्रामीण विकास) पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षित असल्यामुळे १९९९ ते २००२ नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातही त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्यानंतर पुढे खात्यांतर्गत परीक्षा देत पालिका चिटणीस विभागात कनिष्ठ चिटणीस सहाय्यक (मराठी) या पदावर पदोन्नती घेऊन काम केले. तसेच सलग ८ वर्षे स्थायी समिती विभागामध्ये कार्यरत होते. तसेच राजशिष्टाचार व संपर्क विभाग येथे तत्कालिन महापौर महादेव देवळे यांचे सहाय्यक राजशिष्टाचार अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच पुन्हा खात्यांतर्गत परीक्षा देऊन कर निर्धारण व संकलन विभागात विभाग निरीक्षक म्हणून रुजू झाले. आपली जबाबदारी पार पाडत पीएचडी पदवी मिळवण्याची जिद्द बाळगणाऱ्या लोखंडे यांनी त्यासाठी प्रथम एम.फिल. (ग्रामीण विकास) ही पदव्युत्तर पदवी मिळवली व लगेचच मुंबई विद्यापीठाची पीईटी ही पीएचडीची प्रवेश परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आणि सप्टेंबर २०१९ ला ग्रामीण विकास या विषयात पीएचडी पदवीसाठी आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागामार्फत मुंबई विद्यापीठात नोंदणी केली. विभाग निरीक्षक म्हणून काम करत दरवर्षी नेमून दिलेले कर संकलनाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करत त्यांनी पीएचडीचा अभ्यास सुरू ठेवला.

पीएचडीचा अभ्यास करत असताना त्यांना मुबई विद्यापीठाचे आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे माजी संचालक डॉ. दिलीप शंकरराव पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संपूर्ण चार वर्ष अभ्यास करून अजय लोखंडे यांनी पीएचडी ही पदवी मिळविली. त्यांची जिद्द व चिकाटी याचे मुंबई महापालिकेत विविध विभाग कार्यालयात कौतुक करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in