आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर; विमान इंजिनचा सॅफ्रन प्रकल्प गेला हैदराबादला

राज्यातील तरुणांना भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे प्रकल्प एकापाठोपाठ महाराष्ट्राबाहेर जात आहेत.
आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर; विमान इंजिनचा सॅफ्रन प्रकल्प गेला हैदराबादला

राज्यात सत्तांतर झाल्यापासून एकामागून एक मोठे प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याने विरोधकांनी सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपला धारेवर धरले आहे. वेदांता-फॉक्सकॉननंतर बल्क ड्रग पार्क आणि आता टाटा-एअरबसचा मोठा प्रोजेक्ट गुजरातमध्ये हलवण्यात आला आहे. त्यातच आता नागपूरमधील मिहानमध्ये प्रस्तावित असलेला फ्रान्सच्या सॅफ्रन कंपनीचा एक प्रकल्पही राज्याबाहेर गेल्याने विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

राज्यातील तरुणांना भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे प्रकल्प एकापाठोपाठ महाराष्ट्राबाहेर जात आहेत. त्यातच जमीन मिळण्यास दिरंगाई झाल्यामुळे सॅफ्रन प्रकल्प हैदराबादला गेला आहे. १ हजार ११५ कोटी रुपयांची प्राथमिक गुंतवणूक असणारा हा प्रकल्प हैदराबादला गेला. या प्रकल्पाच्या जाण्यामुळे राज्यातील जवळजवळ ५०० ते ६०० कामगारांचा रोजगार बुडाला आहे. तसेच महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता असल्यामुळे सॅफ्रन कंपनीने आपला प्रकल्प अखेर हैदराबादला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, याबाबत अद्याप राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अर्थात एमएडीसी मिहानमध्ये मोठ्या स्वरूपातील नवीन गुंतवणूक आणण्यात अपयशी ठरली आहे. मिहानला डिफेन्स एव्हिएशन हब म्हणून विकसित करण्याचे स्वप्न दाखवण्यात आले होते, पण आता सरकारच्या दिरंगाईमुळे महाराष्ट्रात येणारा सॅफ्रन प्रकल्प हैदराबादला गेला आहे. सॅफ्रन ग्रूप ही फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी विमान तसेच रॉकेटचे इंजिन दुरुस्ती आणि देखभालीचे काम करते. ही कंपनी मिहानमध्ये येण्यास उत्सुक होती, पण सरकारच्या दिरंगाईमुळे हा प्रकल्प हैदराबादला गेला आहे. एकापाठोपाठ चार मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे सरकारवर टीकेची जोरदार झोड सुरू आहे.

सॅफ्रन ग्रुप मिहानमध्ये येण्यास खूप उत्सुक होता, पण जागेबाबतच्या विलंबामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला आहे. या कंपनीने जागेसाठी एमएडीसीशी संपर्क केला होता, पण जागेशी संबंधित विलंबामुळे हा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता नागपूरऐवजी हैदराबादमध्ये उभारण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

सॅफ्रन ग्रुपने एमआरओ सुरू करण्यासाठी भारतातील काही ठिकाणांची यादी निश्चित केली होती. त्यामध्ये नागपूर येथील मिहानचा समावेश होता, पण मिहानमधील जागेशी संबंधित विलंबामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला आहे. काही महिन्यांपूर्वीच या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऑलिव्हर आंद्रेस यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेत हैदराबाद येथील प्रकल्पाबाबत माहिती दिली होती.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा

द्यावा- अरविंद सावंत

“मुख्यमंत्र्यांना अनेक उत्सवांमध्ये जाऊन नाचायला वेळ आहे. परंतु कोणता प्रकल्प बाहेर गेला की ते जबाबदारी स्वीकारत नाहीत आणि महाविकास आघाडी सरकारवर त्याचे खापर फोडतात. आदित्य ठाकरेंनी दावोसमध्ये जाऊन अनेक प्रकल्प राज्यात आणले. परंतु गुजरातमध्ये भाजपच्या पायाखालची माती सरकली असल्यामुळेच राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात येत आहेत. मिहानमध्ये सर्व पायाभूत सुविधा असतानाही तिथून प्रकल्प बाहेर कसे जातात?, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी उत्तर

द्यावे- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. “सत्ताधाऱ्यांनी तूतू-मैंमैं करण्यापेक्षा महाराष्ट्रात जास्तीत जास्त गुंतवणूक कशी येईल, यावर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवायला हवी. त्याचबरोबर चार ते पाच प्रकल्प राज्यातून बाहेर गेले आहेत, त्याचा नीट अभ्यास व्हायला हवा. पायाभूत सुविधांच्या बाबतीत महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा सरस असतानाही सातत्याने प्रकल्प बाहेर का जात आहेत?, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं, असा जाब सुप्रिया सुळे यांनी विचारला.

महाराष्ट्रावर वक्रदृष्टी

का?- अतुल लोंढे

सत्तेच्या हव्यासापोटी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर केले आहे. २०१४ नंतरच महाराष्ट्रावर वक्रदृष्टी का?महाराष्ट्रात पाण्याची, विजेची मुबलकता आहे. तसेच आपल्याकडे कौशल्य असलेले मनुष्यबळदेखील उपलब्ध आहे. तरी प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. प्रकल्प राज्याबाहेर जाणे हा राजकीय करंटेपणा म्हणावा लागेल. सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राच्या जनतेचे सरकारने खूप मोठे नुकसान केले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in