केरळच्या परिवहनमंत्र्यांना ‘बेस्ट’ भुरळ डिजिटल तिकीट प्रणाली, प्रिमियम बसेसचा अँथनी राजू यांनी घेतला आढावा

बेस्ट उपक्रमाला ‘स्मार्ट परिवहन’ या शहरी प्रवर्गामधील नावीन्यपूर्ण कामासाठी सर्वोच्च सन्मान देऊन गौरविले आहे
केरळच्या परिवहनमंत्र्यांना ‘बेस्ट’ भुरळ डिजिटल तिकीट प्रणाली, प्रिमियम बसेसचा अँथनी राजू यांनी घेतला आढावा

मुंबई : पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेस, देशातील पहिली डबलडेकर बसेस प्रवाशांच्या सेवेत, डिजिटल तिकीट प्रणाली, गारेगार प्रवासासाठी प्रिमियम बसेस, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुरू करणे अशा विविध सुविधा बेस्ट उपक्रमाने प्रवाशांना उपलब्ध केल्या आहेत. प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या कामांची चर्चा देशभरात होत असतानाच, केरळचे परिवहनमंत्री अँथनी राजू यांनीही नुकताच बेस्टच्या कामाचा आढावा घेतला. त्यांनाही बेस्टच्या उपक्रमांची भुरळ पडली.

सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक बसगाड्यांचा समावेश आहे आणि २०२७ पर्यंत बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात येणाऱ्या सर्व बसगाड्या इलेक्ट्रिक असतील. बेस्ट उपक्रमाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी उचललेल्या पावलाची दखल फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिज (एफआयसीसीआय) या भारतामधील मोठ्या आणि जुन्या शिखर व्यवसाय संस्थेने घेतली आहे.

बेस्ट उपक्रमाला ‘स्मार्ट परिवहन’ या शहरी प्रवर्गामधील नावीन्यपूर्ण कामासाठी सर्वोच्च सन्मान देऊन गौरविले आहे. या बाबींची दखल घेऊन आणि बेस्ट उपक्रमाच्या विविध योजनांची माहिती मिळविण्याच्या संदर्भात स्वत: अँथनी राजू यांनी कुलाबा येथील बेस्ट उपक्रमाच्या मुख्यालयाला भेट दिली. बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांच्याशी चर्चा करून त्यांनी बेस्टच्या उपक्रमांची माहिती घेतली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in