
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी खारघरमध्ये घडलेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आज याबाबत जाहीर शोक व्यक्त करत यावर राजकारण न करण्याचे आवाहनही केले आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी लाखो श्रीसेवक आले होते. यावेळी उष्माघाताने आतापर्यंत १३ श्री सेवकांचा मृत्यू झाला असून अनेकजण अद्याप रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. यावर त्यांनी जाहीर निवेदन काढत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्र भूषण पद्मश्री ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले की, "महाराष्ट्र शासानाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघरमध्ये आलेले सर्व श्री सदस्य हे माझ्या कुंटुबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला असून या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास सहन करावा लागला. तसेच, त्यातील काहींचा दुर्देवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक असून माझ्या कुटूंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटूंबामधील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलीकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटूंबियांची आणि आमची वेदना सारखीच आहे. यातील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटूंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तसेच, "यावरून कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये. अशी आमची अपेक्षा आहे," असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.