दसरा मेळाव्यावरून पुन्हा संघर्ष शिवाजी पार्कसाठी दोन्ही शिवसेनेकडून अर्ज

शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या वर्षी दोन दसरा मेळावे पार पडले
दसरा मेळाव्यावरून पुन्हा संघर्ष शिवाजी पार्कसाठी दोन्ही शिवसेनेकडून अर्ज

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या वर्षी दोन दसरा मेळावे पार पडले. यंदाही दसरा मेळाव्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज दाखल झाले आहेत. ज्या पक्षाचा अर्ज पहिला त्या पक्षाचा आवाज शिवाजी पार्क मैदानात घुमणार आहे, मात्र कुठल्या पक्षाने आधी अर्ज दिला, याबाबत पालिकेच्या ‘जी’ उत्तर विभागाने मौन बाळगणेच पसंत केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा न्यायालयीन लढाई होणार की पालिका आपल्या अधिकारात परवानगी देणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना गेल्या ४० वर्षांपासून शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करत आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम केला आणि ठाकरेंची शिवसेना व एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोघांतील वाद उफाळून आला आहे. गेल्या वर्षी शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा कोणाचा हा तिढा न्यायालयीन हस्तक्षेपानंतर निकाली निघाला होता. न्यायालयाच्या निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेने बीकेसीत दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. मात्र, यंदाच्या वर्षीही तोच प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंची शिवसेना व शिंदेंची शिवसेना दोन्ही पक्षांकडून पालिकेच्या जी उत्तर विभागाकडे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या दसऱ्या मेळाव्यात आवाज कोणाचा हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईलच.

दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंची शिवसेना व शिंदेंची शिवसेना दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल झाले आहेत. याबाबत मुंबई मनपाच्या नियमानुसार निर्णय घेतला जाईल, असे पालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयाकडून सांगण्यात आले.

परंपरेनुसार परवानगी द्यावी -किशोरी पेडणेकर

दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात ठाकरेंच्या शिवसेनेकडून होतो. गेल्या वर्षी हाच प्रश्न न्यायालयात गेला आणि न्यायालयानेही ठाकरेंच्या शिवसेनेला परवानगी दिली. ठाकरेंची शिवसेना व शिवाजी पार्क मैदान अतुट नाते असून परंपरेनुसार परवानगी मिळणे अपेक्षित आहे. राज्यात ज्यांची सत्ता आहे ते कुठेही दसरा मेळावा आयोजित करू शकतात.

किशोरी पेडणेकर, माजी महापौर, (उबाठा)

अर्जाबाबत गुप्तता!

मुंबई पालिकेच्या जी उत्तर विभागानेही कुणाचा अर्ज पहिला आला आहे, याबाबत गुप्तता पाळली आहे. पालिका कार्यालयाला सुट्टी असून मंगळवारी कोणाचा अर्ज पहिला हे स्पष्ट होईल, असे जी उत्तर विभाग कार्यालयाने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in