
बाप्पाचे आगमन आणि विसर्जन खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने रॅपिड हार्डनिंग काँक्रीट तंत्रज्ञानाचा वापर केला. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत गणेशोत्सवात पालिकेने तब्बल सहा हजार खड्डे बुजवले असून यासाठी पाच हजार कोटी रुपये खर्च केल्याचे पालिकेच्या पायाभूत सुविधा उपायुक्त उल्हास महाले यांनी सांगितले.
बाप्पाचे आगमन होण्यापूर्वी मुंबईतील खड्ड्यांवरून पालिकेला टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाने खड्डे बुजवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. गोदरेज आणि अल्ट्राटेक कंपनीकडून रॅपिड हार्डनिंग काँक्रीट घेण्यात आले. या काँक्रीटच्या वापरानंतर रस्त्यावर वाहतूक सुरू करण्यासाठी सहा तासांचा वेळ लागत असल्याने रात्रीच्या वेळी काम करण्यावर भर देण्यात आला. तसेच भर पावसातही खड्डे भरता येणाऱ्या कोल्डमिक्सचा वापरही वॉर्डस्तरावर करण्यात आला. यासाठी २४ वॉर्डमध्ये तीन हजार ‘कोल्डमिक्स’चा पुरवठा पावसाळ्याआधीच करण्यात आला आहे.