
मुंबई : म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या ५३११ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेच्या "गो लाईव्ह" कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. कोंकण मंडळाच्या सोडतीमध्ये १०१० सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेतील आहेत.
वांद्रे पूर्व येथील एका सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाअंतर्गत बोलताना जयस्वाल यांनी सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना शुभेच्छा दिल्या व ते पुढे म्हणाले की, राज्य शासनाच्या समजातील शेवटच्या घटकाला परवडणाऱ्या दरातील घरे मिळवीत या उद्दिष्टपूर्ती प्रती म्हाडा कटिबद्ध आहे. येत्या वर्षभरात राज्यात जास्तीत जास्त गृहबांधींनीचे प्रकल्प उभारणीचे नियोजन सुरू असल्याचे देखील ते म्हणाले. याप्रसंगी व्यासपीठावर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी अरुण डोंगरे, म्हाडाचे मुख्य अभियंता-१ धीरजकुमार पंदिरकर, मुख्य अभियंता-२ सुनील जाधव, मुख्य अभियंता-३ शिवकुमार आडे, कोंकण गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे मुख्य अधिकारी रवींद्र पाटील, म्हाडाचे सचिव राजकुमार सागर, उपमुख्य अभियंता महेशकुमार जेसवानी आदी उपस्थित होते.
७ नोव्हेंबर रोजी सोडत
पात्र अर्जाची संगणकीय सोडत ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केली जाणार असून, अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे , ई-मेल द्वारे तसेच ॲपवर प्राप्त होणार आहे. तसेच त्याच दिवशी सायंकाळपासून यशस्वी अर्जदारांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.