नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलिजियम’ने मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या सात अतिरिक्त न्यायमूर्तींची कायम न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. याशिवाय दोन अतिरिक्त न्यायमूर्तींचा कार्यकाळ वाढविण्याची शिफारसही करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती पदावर कार्यरत असलेल्या संतोष चपळगावकर, मिलिंद साठ्ये, नीला गोखले, यानशिवराज खोब्रागडे, महेंद्र चंदवानी, अभय वाघोसे आणि रवींद्र जोशी यांची कायम न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या ‘कॉलिजियम’ने केली आहे.
याशिवाय उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून कार्यरत असलेल्या संजय देशमुख व वृषाली जोशी यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवण्याची शिफारस ‘कॉलिजियम’ने केली आहे. ‘कॉलिजियम’ने दिल्ली उच्च न्यायालयात कायम न्यायमूर्ती म्हणून गिरीश काटपलिया, मनोज जैन आणि धर्मेश शर्मा यांची नियुक्ती करण्याची शिफारससुध्दा केली आहे.