
अत्यंत कडक शिस्तीचे आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून परिचित असलेले विवेक फणसळकर यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी गृहविभागाने बुधवारी नियुक्ती केली. ते सध्या महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळात व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. गुरुवारी संजय पांडे निवृत्त होत असल्याने बुधवारी सायंकाळी उशिरा विवेक फणसळकर यांच्या मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश काढण्यात आले.
मुंबईचे ४६ वे पोलीस आयुक्त म्हणून गुरुवारी सायंकाळी ते सूत्रे हाती घेणार आहेत. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी गृहविभागाने संजय पांडे यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली होती. संजय पांडे हे ३० जूनला निवृत्त होणार होते. त्यामुळे त्यांना पोलीस आयुक्तपदी कमी कालावधी मिळाला होता. त्यांना गृहविभागाकडून मुदतवाढ मिळण्याची शक्यता होती. मात्र, आघाडी सरकारच संकटात असल्याने त्यांच्या मुदतवाढीची शक्यता मावळली होती.