सफाई कामगार मुंबईचे खरे हिरो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार; स्वच्छ मुंबई अभिनयाला सुरुवात

शीव येथील लोकमान्‍य टिळक पालिका रूग्‍णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयास मुख्‍यमंत्र्यांनी भेट दिली.
सफाई कामगार मुंबईचे खरे हिरो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार; स्वच्छ मुंबई अभिनयाला सुरुवात

मुंबई : स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी मुंबई स्वच्छ करण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेचे सफाई कामगार पार पाडतात. त्यामुळे स्वच्छ मुंबईसाठी झटणारे सफाई कामगार मुंबईचे खरे हिरो असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. मुंबईत दर शनिवारी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. पालिकेने सुरू केलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा (डीप क्लिन) शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी धारावीतून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, अश्विनी जोशी, डॉ सुधाकर शिंदे, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख प्रशांत तायशेटे, जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे आदी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी सायन, धारावी, कमला नेहरू पार्क, बाणगंगा, बीआयटी चाळ या भागांना भेटी देत मुख्यमंत्र्यांची ही स्वच्छतेची मॅरेथॉन जवळपास सहा तास सुरू होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी अंतर्गत रस्ते, गटारे नालेसफाई, रस्ते सफाई कामांची पाहणी केली जागोजागी सफाई कामगारांशी त्यांनी संवाद साधला.

धारावी टी जंक्शन येथून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. शालेय विद्यार्थी, सफाई कामगार यांच्याशी संवाद साधत मुंबईची स्वच्छता मोहिम ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मुख्यमंत्र्यांनी धारावी, शाहू नगर, एकेजी नगर, कमला नेहरू पार्क, बाणगंगा तलाव, गिरगाव चौपाटी येथील स्वच्छतेची पाहणी केली. नालेसफाई, रस्ते धुलाईच्या पाहणीसाठी मुख्यमंत्र्यांनी अनेक ठिकाणी पायपीट केली. धारावी भागात मोहिमेला सुरूवात झाल्यानंतर या भागातील सार्वजनिक स्वच्छता गृह, शौचालये यांची दिवसातून पाच वेळा स्वच्छता करण्यात यावी. केवळ मुख्य रस्त्यांच्या स्वच्छतेवर भर न देता झोपडपट्टीतील अंतर्गत रस्ते, पदपथ यांची देखील साफसफाई करा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मोहिमेचा परिणाम येत्या काही दिवसात दिसेल

प्रदुषणमुक्तीवर उपाय योजना म्हणून मुंबईचे रस्ते धुताना आधी त्यावरील माती उचलून मग उच्च दाबाने पाणी मारून रस्ते धुवावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. स्वच्छता मोहिमेचा परिणाम येत्या काही दिवसात नक्कीच बघायला मिळेल. सफाई कर्मचारी सकाळी लवकर कामाला सुरूवात करतात. मुंबईकरांच्या निरोगी आयुष्याची जबाबदारी त्यांच्यावर असून, त्यांनी ठरवले तर मुंबई, स्वच्छ, निरोगी आणि प्रदुषणमुक्त व्हायला वेळ लागणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गिरगाव चौपाटीवर रंगले क्रिकेट

गिरगाव चौपाटीवर पाहणीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या बच्चे कंपनीने छायाचित्र काढण्याची विनंती केली. त्यांनी छायाचित्र घेतल्यानंतर मुलांनी मुख्यमंत्र्यांच्या हातात बॅट दिली आणि आमच्या सोबत खेळा अशी विनंती केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुलांसोबत काही क्षण क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.

झिरो प्रिस्‍क्रिपशन धोरण लवकर राबवा!

शीव येथील लोकमान्‍य टिळक पालिका रूग्‍णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयास मुख्‍यमंत्र्यांनी भेट दिली. रूग्‍णालयातील अतिदक्षता विभाग, ट्रॉमा केअर सेंटर, कान-नाक-घसा विभाग, तातडीची वैद्यकीय सेवा आणि इतर वैद्यकीय विभाग तसेच स्वयंपाक गृहाची पाहणी केली. यावेळी मुख्‍यमंत्र्यांनी वैद्यकीय अधिकारी, रूग्‍ण, रुग्णांचे नातेवाईकांशी संवाद साधत त्‍यांच्‍या अडीअडचणी जाणून घेतल्‍या. पालिकेच्‍या रुग्‍णालयात देण्‍यात येणा-या सर्व वैद्यकीय सुविधा व औषध उपचार नागरिकांना उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी "झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी" लवकरात लवकर सुरू करावी, असे ते म्‍हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in