एमएमआरडीएच्या बैठकीत विविध प्रकल्पांना मान्यता

मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली
एमएमआरडीएच्या बैठकीत विविध प्रकल्पांना मान्यता

मुंबई महानगर प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी एमएमआरडीए सदैव कार्यरत असून मुंबई महानगराच्या विकासाला गती देण्यासाठी विविध प्रकल्पांची कामे वेळेपूर्वी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले. मुंबई महानगर प्रदेशातील नागरीकांसाठी पायाभूत सुविधांचे प्रकल्प मेट्रो, रस्ते, दळणवळण, वाहतूक सुधारणा सुधारण्याच्या दृष्टीने तसेच नागरिकांचे पुनर्वसन करण्याबाबत निर्णय एमएमआरडीएच्या बैठकीत घेण्यात आले.

एमएमआरडीएची १५३ वी बैठक मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे विणण्यासाठी प्राधिकरणामार्फत महत्वाकांक्षी मेट्रो मार्गिका हाती घेतल्या आहेत.

एमएमआरडीएच्या बैठकीतील निर्णय

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासोबतच या शहरांचा विकास करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात येणाऱ्या प्रस्तावित प्रकल्पांच्या कामाकरीता सुसाध्यता अहवाल आणि सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यासाठी सल्लागारांची नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली.

ठाणे शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी रायलादेवी तलाव सुशोभिकरणाच्या कामास ३९.३१ कोटी प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

पूर्वद्रुतगती महामार्गावर ठाणे शहरातील तीन हात नाका येथे वाहतूक सुधारणा प्रकल्पास तसेच त्याकरीता अपेक्षित अंदाजपत्रकीय खर्च २८९.१२ कोटी रुपयांच्या प्रस्तावास आणि भिवंडी वाडा राज्यमार्ग क्र. ३५ वरील विश्वभारती नाका, मिनार ते वडपे या रस्त्याच्या बांधकामासाठी १४३ कोटीच्या रकमेस प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसहाय्यातून देहरजी मध्यम प्रकल्प राबविण्यात येणार असून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची कामे कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

मुंबई - अहमदाबाद जलदगती रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील प्राधिकरणाची जमीन नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लि. (एन.एच.एस.आर.सी.एल.) यांना केलेल्या हस्तांतरणास कार्योत्तर मंजुरी देण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in