ॲण्टाॅप हिल येथे जलवाहिनीला गळती: हजारो लिटर पाणी वाया ; पाणी जपून वापरा, पालिकेचे नागरिकांना आवाहन

मुंबईत गेल्या काही दिवसांत जलवाहिनी, पाइपलाईन फुटण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत
ॲण्टाॅप हिल येथे जलवाहिनीला गळती: हजारो लिटर पाणी वाया ; पाणी जपून वापरा, पालिकेचे नागरिकांना आवाहन

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांत जलवाहिनी, पाइपलाईन फुटण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मंगळवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ - उत्तर विभागातल्या ॲण्टाॅप हिल परिसरातील रावजी गणात्रा मार्ग सी. जी. एस. कॉलनी येथील ६०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागल्याची घटना घडली. गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. पालिकेच्या जल विभागाने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. काम होईपर्यंत काही विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून, काही भागात बुधवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

'या' भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम!

‘एफ उत्तर’ विभागातील कोकरी आगर, विजय नगर, संगम नगर, दोस्ती एकर्स, हिम्मत नगर, शांती नगर, आझाद मोहल्ला, ॲण्टाॅप हिल, वडाळा पूर्व, गणेश नगर, शिवशंकर नगर, नेहरू नगर , इंदिरा नगर, वडाळा ट्रान्झिट कॅम्प, पंजाबी कॉलनी, सेवा समिती, म्हाडा कॉलनी, सायन कोळीवाडा, बी. पी. टी., बंगालीपुरा, राजीव गांधी नगर ई. ठिकाणी बुधवारी पाणीपुरवठा होणार नाही.

logo
marathi.freepressjournal.in