महालक्ष्मी रेसकोर्ससाठी आर्किटेक्टनी दंड थोपटले; जागा मोकळी ठेवण्याबाबत १५४ आर्किटेक्ट, तज्ज्ञांचे मु‌ख्यमंत्र्यांना पत्र

महालक्ष्मी रेसकोर्सचा विकास करण्याच्या राज्य सरकारच्या घोषणेबाबत १५४ आर्किटेक्ट व तज्ज्ञांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून विरोध दर्शवला आहे.
महालक्ष्मी रेसकोर्ससाठी आर्किटेक्टनी दंड थोपटले; जागा मोकळी ठेवण्याबाबत १५४ आर्किटेक्ट, तज्ज्ञांचे मु‌ख्यमंत्र्यांना पत्र

एस. बालकृष्णन/मुंबई

महालक्ष्मी रेसकोर्सचा विकास करण्याच्या राज्य सरकारच्या घोषणेबाबत १५४ आर्किटेक्ट व तज्ज्ञांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून विरोध दर्शवला आहे. मुंबई शहरात मध्यवर्ती मैदान असणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सध्या मुंबईत प्रत्येक नागरिकाच्या वाट्याला १.१ चौरस मीटर जागा येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार, प्रत्येक नागरिकाला ९ चौरस मीटर जागा येणे आवश्यक आहे. न्यूयॉर्कमध्ये २६.४ चौरस मीट तर लंडनकरांच्या वाट्याला ३१.६ चौरस मीटर जागा येते. मोकळी जागा नसल्याने मुंबईच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

या आर्किटेक्टच्या गटाने सांगितले की, शहरातील नागरिकांना निवांतपणे जगण्यासाठी, व्यायाम व गप्पा मारण्यासाठी मध्यवर्ती मैदानाची गरज आहे. सध्या मुंबईची हवा अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे जानेवारी २०२१ पासून शहरात १४ हजार जणांचा बळी गेला आहे.

सरकार व मुंबई मनपाच्या प्लॅनच्या विरोधात रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या व्यवस्थापन समितीने दंड थोपटले आहेत. मुंबईचे मनपा आयुक्त इक्बाल चहल यांच्यासोबत त्यांनी १८ जानेवारी सायंकाळी ५ वाजता खुली चर्चा ठेवली आहे. चहल हे क्लबच्या सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. तसेच क्लबने ३० जानेवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. यात विशेष प्रस्ताव पारित केला जाणार आहे.

एका सदस्याने नाव सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मुंबई मनपाकडून येणाऱ्या दबावाबाबत क्लबच्या सदस्यांमध्ये चर्चा केली जाणार आहे. क्लबने यापूर्वीच १२० एकर जमीन मुंबई मनपाला देण्याचे मान्य केले. आता फक्त मुंबई मनपासोबत करार करण्यासाठी अधिकार मागितले आहे. मुंबई मनपा दबाव आणून करारपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी सांगत आहे. ॲॅमॅच्युअर रायडर क्लब हा यातून बाहेर पडला असून, त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेण्याचा इशारा दिला आहे. ॲॅमॅच्युअर रायडर क्लब हा रेसकोर्सचा अनेक वर्षांपासून भाग आहे.

मोकळ्या जागेवर अतिक्रमण करू नका

राज्य सरकारने रेसकोर्स मैदानात मनोरंजन पार्क उभारण्याचा विचार चालवला आहे. त्याला या आर्किटेक्टनी विरोध केला. मुंबई मनपाने २२७ एकरची जमीन रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला लीजवर दिली होती. त्याची मुदत संपली आहे. या रेसकोर्समधील १२० एकर जमिनीवर मुंबई मनपाला मनोरंजन पार्क उभारायचे आहे. या विरोधात हजारो नागरिकांनी दंड थोपटले आहेत. मुंबईतील अखेरच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करू नका, अशी त्यांची मागणी आहे.

logo
marathi.freepressjournal.in