मुंबई : आर्किटेक्चर इंटेरिअर डिझाईन असलेल्या एका ६० वर्षांच्या व्यावसायिक महिलेच्या सुमारे दिड कोटीचा अपहार करून फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या व्यावसायिक महिलेकडे अकाऊंटटसह सेक्रेटरी म्हणून काम करणाऱ्या ऋतुजा तुषार परब हिच्याविरुद्ध दादर पोलिसांनी भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ६० वर्षांच्या तक्रारदार समीरा किर्ती राठोड या आर्किटेक्चर इंटेरिअर डिझाईन असून, त्या त्यांच्या कुटुंबीयांसोबत ताडदेव परिसरात राहतात. तिचे दादर परिसरात एक कार्यालय असून, ऋतुजा परब ही गेल्या पंधरा वर्षांपासून तिच्याकडे अकाऊंटटसह सेक्रेटरी म्हणून कामाला होती. तिच्यावर कार्यालयातील सर्व जमाखर्चाची जबाबदारी होती. गेल्या काही वर्षांपासून तिच्याविरुद्ध काही ग्राहकांकडून तक्रारी येऊ लागल्या होत्या.
सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते; मात्र अलीकडेच्या काळात या तक्रारीचे प्रमाण प्रचंड वाढले होते. त्यामुळे तिने तिला जाब विचारला होता. यावेळी ऋतुजाने कौटुंबिक कारणावरून तिच्याकडून काही चुका झाल्याचे मान्य केले होते; मात्र यापुढे लक्ष ठेवून काम करण्याचे आश्वासन दिले होते. इन्कम टॅक्स फाईल करताना तिच्याकडून पुन्हा काही तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे इन्कम टॅक्स फाईल करताना अनेक समस्या येत होत्या. त्यामुळे तिने तिला एप्रिल २०२३ रोजी कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर तिने जॅनिस पाटील हिला अकाऊंटट तर सलमान फारुख मंसुरीला सीए म्हणून कामावर ठेवले होते.
यावेळी या दोघांनी गेल्या काही वर्षांतील जमाखर्चाचा तपशील पाहिला असता त्यांना समीरा राठोड यांच्या खात्यातून ऋतुजाच्या बँक खात्यात ९६ लाख रुपये ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी तिला या पैशांबाबत विचारणा केली असता, समीराने ही रक्कम तिने कधीच तिच्या बँक खात्यात पाठविले नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी गेल्या तीन वर्षांतील तपशीलची पाहणी केली होती. त्यात ऋतुजाने सुमारे दिड कोटीचा अपहार करून फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते.