‘आरोग्य आपल्या दारी’ अभियान आता मुंबईत; स्वच्छता अभियानात मुख्यमंत्र्यांची घोषणा

गेली दोन महिने मुंबईत स्वच्छता मोहीम राबवल्यामुळे वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे.
‘आरोग्य आपल्या दारी’ अभियान आता मुंबईत; स्वच्छता अभियानात मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : गेली दोन महिने मुंबईत स्वच्छता मोहीम राबवल्यामुळे वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबरच पालिकेची संपूर्ण यंत्रणा स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी, समाजसेवी संस्था या सर्वांचे हे सामूहिक यश आहे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. सार्वजनिक स्वच्छतेबरोबरच आता मुंबईकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी शासन आपल्या दारी या अभियानाच्या धर्तीवर मुंबई महानगरात ‘आरोग्य आपल्या दारी’ अभियान राबवणार आहे, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

महानगरपालिकेच्या सखोल स्वच्छ‍ता मोहीमेअंतर्गत पश्चिम उपनगरांमध्ये होत असलेल्या स्वच्छता कामांची एकनाथ शिंदे यांनी रविवारी सहा तासांच्या दौऱ्यात ठिकठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार अतुल भातखळकर, आमदार राजहंस सिंग, पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उपआयुक्त (परिमंडळ ७) डॉ. भाग्यश्री कापसे, उपआयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (अतिरिक्त कार्यभार) संजोग कबरे, सहायक आयुक्त (आर. उत्तर) नयनीश वेंगुर्लेकर, सहायक आयुक्त (आर दक्षिण) ललित तळेकर, सहायक आयुक्त (आर मध्य) संध्या नांदेडकर, सहायक आयुक्त‍ (पी उत्तर) किरण दिघावकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दहिसर पूर्व येथे शिववल्लभ छेद रस्त्यावर वाहतूक बेटाची पाणी फवारणीने स्वच्छता करून मुख्यमंत्र्यांनी रविवारच्या मोहिमेचा प्रारंभ केला. येथील आजी-आजोबा उद्यानात पालिकेच्या वतीने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेत सहभागी शालेय विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना प्रोत्साहित केले. या उद्यानात स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना, मुंबईत ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारावेत. त्यामध्ये आवश्यक ती साधने, साहित्यसामुग्री उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. यानंतर नॅन्सी कॉलनी बस आगार येथे स्वच्छतेची पाहणी केली. तर कांदिवली (पूर्व) ठाकूरगावमधील सिंग इस्टेट येथे चौकातील रस्ता जेट स्प्रेच्या सहाय्याने पाणीफवारणी करून शिंदे यांनी स्वत: स्वच्छ केला. रस्ते, पदपथ, सार्वजनिक भिंती स्वच्छ करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी याठिकाणी दिले. कांदिवली (पूर्व) वडारपाडा येथील महाआरोग्य शिबिरास त्यांनी भेट दिली. ­

‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ धोरणाची अंमलबजावणी!

पालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ धोरण लागू करण्यात येत आहे. त्यापुढे जाऊन आता महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘आरोग्य आपल्या दारी’ हा उपक्रम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेचे आरोग्य कर्मचारी मुंबईतील प्रत्येक घरी जाऊन आरोग्य तपासणी करतील. आवश्यक वैद्यकीय तपासण्या आणि पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करतील. पालिकेच्या‍ रुग्णालयांमध्ये ज्येष्ठांसाठी स्वतंत्र विभाग असावेत, ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी तजवीज करा, असे निर्देश त्यांनी दिले.

अग्निशमन केंद्राचे लोकार्पण!

मालाड (पूर्व) मधील आप्पापाडा येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे लोकार्पण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. कबड्डीमहर्षी कै. बुवा साळवी मैदानात स्थित या आपला दवाखान्याचा लाभ आनंदवाडी, लक्ष्मणनगर, सिद्धार्थनगर आदी परिसर मिळून सुमारे २५ ते ३० हजार नागरिकांना होणार आहे. या आपल्या दवाखान्याला म. वा. देसाई महानगरपालिका रुग्णालयाची संदर्भित सेवा मिळणार आहे. बुवा साळवी मैदानाच्या शेजारी नव्याने सुरू झालेल्या लघू अग्निशमन केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी केले.

जॉगिंग ट्रॅक, ध्यानधारणा, विपश्यना सोयीसुविधा!

बुवा साळवी मैदानाला लागूनच असलेल्या शारदाबाई गोविंद पवार उद्यानाचा विकास करून पार्क व उद्यान तसेच अनुषांगिक सेवानिर्मित करण्यात येत आहे. या सुशोभीकरणाच्या कोनशिलेचे अनावरण शिंदे यांच्या हस्ते झाले. सुमारे ५ एकर क्षेत्रफळाच्या या जागेवर जॉगिंग ट्रॅक, ध्यानधारणा, विपश्यना, सांस्कृतिक सभागृह, मुलांना खेळण्यासाठी कृत्रिम हिरवळ असलेली जागा, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा, व्ह्यूइंग गॅलरी, ज्येष्ठ नागरिकांसाठी जागा, कबड्डी-कुस्ती क्रीडाक्षेत्र व खुली व्यायामशाळा, सुशोभीत फुलांची रोपे व हिरवळ, एलईडी दिवे, सुरक्षारक्षक दालन, प्रसाधनगृह अशा वैविध्यपूर्ण सेवा या उद्यानामध्ये आता पुरवल्या जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in