
‘ईडी’च्या कारवाईनंतर खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. “ही कारवाई अगोदरच व्हायला हवी होती. पत्रकार म्हणून सुरुवात करणाऱ्या संजय राऊतांकडे एवढे पैसे आले कुठून. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी पदाचा दुरुपयोग केला. संजय राऊत भ्रष्टाचारी आहेत. याअगोदरच त्यांना अटक करायला हवी होती. हा भ्रष्टाचारविरोधात लढणारा महाराष्ट्र आहे. जर चोरी केली नाही तर भीती का वाटते?,” असा सवाल नवनीत राणांनी विचारला आहे.
“पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांनी एका महिलेला शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. जर तुम्ही स्वच्छ चारित्र्याचे आहात, तर तुम्ही आत्तापर्यंत ‘ईडी’समोर जाऊन आपली बाजू का मांडली नाही. सगळे पुरावे असल्याशिवा ‘ईडी’ कोणावरही कारवाई करत नाही. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा याबाबत निकाल दिला आहे. संजय राऊत महाविकास आघाडीचे एजंट बनले होते. जवळजवळ २५ ते ३० कंपन्यांमध्ये राऊत भागीदार आहेत. संजय राऊतांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यामुळे त्यांना अटक होणारच,” असा विश्वासही नवणीत राणांनी व्यक्त केला.