
मुंबई : गुंतवणुकीवर जास्त कमिशनच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी मोरेश्वर रामचंद्र सुतार या ठगाला मालाड पोलिसांनी अटक केली. एका फुटबॉल कोचच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मालाड येथे राहणाऱ्या २८ वर्षांच्या जोएल रायपन्न चेट्टी या फुटबॉल प्रशिक्षकाला १६ ऑगस्टला नेहा नावाच्या महिलेने फोन करून त्यांना यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब केल्यास चांगली रक्कम कमिशन म्हणून मिळेल, असे सांगितले. त्याला भुलून त्यांनी १६ ते २१ ऑगस्ट या कालावधीत ९ लाख ८७ हजार ६२० रुपये ट्रान्स्फर केले होते.
मात्र नंतर कमिशन मिळणे बंद झाल्यावर त्यांनी संबंधिताला याबाबतीच विचारणा केली. मात्र कोणताही प्रतिसाद मिळू न लागल्याने त्यांनी फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच मालाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्याने नेहासह तिच्या इतर सहकाऱ्यांविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.