गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात अगदी शिस्तबद्ध पद्धतीने काळाचौकीच्या महागणपतीचा आगमन सोहळा रविवारी गणसंकुलातून सुरू होऊन लालबाग आणि काळाचौकीपर्यंत पोहोचला. स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवामुळे यंदा सुरुवातीला एका चिमुकलीच्या रूपात भारतमाता साकारण्यात आली होती. मोर, कोंबडा आणि वाघ, सिंह नृत्याने जणू काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या महागणपतीच्या आगमन मिरवणूक सोहळ्याला वेगळीच शोभा आणली होती.६७ व्या वर्षात पदार्पण केलेल्या या मंडळाने दरवर्षी नवनवे उपक्रम घेउन आपले वेगळेपण जपले आहे. लालबाग उड्डाणपूल, उड्डाणपुलाखालील जागा, शेजारी असलेल्या घरांच्या मोकळ्या जागेतून गणेशभक्त महागणपतीच्या आगमन मिरवणूक सोहळ्याचे क्षण डोळ्यात साठवत होते. जास्वंदावरील २२ फुटी महागणपतीची मूर्ती लालबाग उड्डाणपुलाखालून जाताना अनेक भक्तांनी गणेशमूर्तीचे दर्शन घेतले. तसेच बाप्पासोबत सेल्फी घेण्याचा मोह काहींना आवरला नाही.