
अरूप्रीत टायगर्स संघाने डब्लूएनएस ग्लोबल सर्व्हिस ब संघावर १०९ धावांनी विजय मिळवत पहिल्या एमसीए कार्पोरेट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
बॉम्बे जिमखाना मैदानावर खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत अरूप्रीत टायगर्सनी प्रथम फलंदाजी करताना ४० षट्कांत २१६ धावा केल्या. आकाश जांगिडने ४६ धावांचे योगदान दिले. त्याला श्रेयस वैद्य (३९ धावा), ओमकार रहाते (३३ धावा) आणि ऋषिकेश पवारची (२७ धावा) यांनी शानदार साथ दिली. ग्लोबल सर्व्हिसेसकडून हर्ष मिश्राने तीन तसेच श्रेयस हडकर, ईशान धुमाळ आणि राहुल किरोडियन यांनी प्रत्येकी दोन विकेट टिपल्या.
अरूप्रीत टायगर्स संघाच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करताना प्रतिस्पर्धी डब्लूएनएस ग्लोबल सर्व्हिस ब संघाला ३३.२ षट्कांत १०७ धावांवर रोखले. त्यांच्याकडून केवळ आयूष बिडवाईने (२३ धावा) अल्पसा प्रतिकार केला.
अरूप्रीत संघाकडून ऋषी लोखंडे, सीमांत दुबे, सॉरकॉस वैद्य आणि ऋषिकेश पवारने प्रत्येकी दोन विकेट घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.