एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही तपास यंत्रणेला सहकार्य करायला तयार - क्रांती रेडकर

समीर वानखेडेंवरील आरोप केवळ आरोप आहेत, त्यांच्यावरील आरोप चुकीचे आहेत, हे सर्वांना माहिती आहे.
एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही तपास यंत्रणेला सहकार्य करायला तयार - क्रांती रेडकर

अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सीबीआयने वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नवीन माहिती सामोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यायबाबतचे वृत्त दिले आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे आणि इतर अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणातील साक्षीदार के पी गोसावी याने आर्यन खानच्या कुटुंबाकडून २५ कोटी रुपये उकळण्याची योजना आखली असल्याचे सीबीआयने एफआयआरमध्ये सांगितलं आहे.

याप्रकरणी समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी एएनआय या वृत्त संस्थेला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, "समीर वानखेडेंवरील आरोप  केवळ आरोप आहेत, त्यांच्यावरील  आरोप चुकीचे आहेत, हे सर्वांना माहिती आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर आमचा विश्वास असून एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही तपास  यंत्रणेला सहकार्य करायला तयार आहोत, " असे रेडकर यांनी  म्हटले आहे.

तसेच समीर वानखेडे यांनी देखील याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''सीबीआयने काल माझ्या निवासस्थानी छापा टाकला. यावेळी १२ तासांपेक्षा जास्त वेळ झडती घेत त्यांना १८ हजार रोकडसह मालमत्तेची ४ कागदपत्रं  सापडली. ही मालमत्ता मी सेवेत रुजू होण्यापूर्वी घेतली आहे," अशी प्रतिक्रिया वानखेडे यांनी दिली आहे.

एनसीबीने २ ऑक्टोबर २०२१ रोजी टाकलेल्या धाडीत ड्रग्जप्रकरणी आर्यनखानसह  २० जणांना अटक केली होती. एनसीबीचे तत्कालीन संचालक समीर  वानखेडेंनी  आर्यन खानला तब्बल महिनाभर कोठडीत ठेवलं  होतं. मात्र, पुराव्याअभावी आर्यनची  निर्दोष सुटका झाली होती. दरम्यान, एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी आर्यनला  सोडण्यासाठी २५ कोटींची  लाच मागितली असल्याचा आरोप केला होता. तसेच यातील ८ कोटी समीर वानखेडेंना देण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं.

logo
marathi.freepressjournal.in