मुंबई : वीज बिल भरण्यासाठी बेस्ट उपक्रमाने सुरू केलेली दक्षिण मुंबई परिसरातील तब्बल १२ वीज बिल भरणा केंद्र बंद अवस्थेत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या वीज ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, बेस्ट उपक्रमाने जातीने लक्ष घालून बंद असलेली वीज बिल भरणा केंद्र तातडीने सुरू करावीत, अशी मागणी करणारे पत्र बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांना पाठवल्याचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विभागप्रमुख दिलीप नाईक यांनी सांगितले.
मुंबई शहरात बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येतो. मुंबई शहर विभागात बेस्ट उपक्रमाचे १० लाख ८० हजार वीज ग्राहक आहेत. वीज बिलाचा भरणा करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने ठिकठिकाणी वीज बिल भरणा केंद्र सुरू केली, तर ऑनलाईन वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र ऑनलाईन वीज बिल भरणे शक्य नसलेल्या वीज ग्राहकांसाठी वीज बिल भरणा केंद्र सुरू केली आहेत.
वीज बील केंद्राच्या माध्यमातून दिवसाला लक्षावधी रुपयांची रोकड जमा होत असते. एकीकडे बेस्ट तोट्यात असताना जेथे पैसे जमा करण्याचे मार्ग आहेत ती वीज बिल केंद्र बंद करून नागरिकांना त्रास देण्याचे प्रयोजन काय, असा सवाल नाईक यांनी केला आहे.
याठिकाणी वीज बिल भरणा केंद्र ठप्प!
दोन टाकी, कामाठीपुरा, जे.जे. रुग्णालय, गोल देऊळ, खेतवाडी, प्रार्थना समाज, वाळकेश्वर, चंदनवाडी, झावबावाडी, मॅजेस्टीक सिनेमा, गिरगाव, फणसवाडी (चुकून कधी तरी सुरू असते).