मुंबई : गेल्या ७ ते ८ वर्षांनंतर मुंबई अग्निशमन दलात तब्बल ९१० जवानांची भरती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेत ९१० जवानांमध्ये २५० हून अधिक महिला जवानांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात ४५९ जवान कर्तव्यावर हजर झाले असून उर्वरित जवान लवकरच सेवेत रूजू होतील, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली. दरम्यान, अत्याधुनिक तंत्रज्ञानासह अधिकच्या जवानांमुळे अग्निशमन दलाचे बळकटीकरण झाले आहे.
आग लागली, झाडावर पक्षी अडकला, इमारत अथवा इमारतीचा भाग कोसळला. तर पहिला फोन खणखणतो तो अग्निशमन दलाच्या कंट्रोल रूमचा. अग्निशमन दलात सद्यस्थितीत अधिकारी व जवान असे २५०० जण सेवा बजावत आहेत. परंतु आडव्या उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असताना अग्निशमन दलातील जवानांची संख्या अपुरी पडू लागली. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन दलात कायमस्वरूपी भरती करण्याचा निर्णय तब्बल ७ ते ८ वर्षांनी घेण्यात आला.
गेल्या वर्षी अग्निशमन दलात जवानांच्या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून तसेच अन्य राज्यांतूनही लाखोंपेक्षा इच्छुक उमेदवार मुंबईत दाखल झाले होते. यातून अग्निशमन दलात ९१० उमेदवारांची निवड करण्यात आली. यामध्ये महिला आणि पुरुष उमेदवार होते. महिला उमेदवारांसाठी २७३ जागा होत्या. पहिल्या टप्प्यात ५५५ उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यांना ५ जुलै २०२३ पासून प्रशिक्षणासाठी अग्निशमन दलाच्या वडाळा, मानखुर्द, बोरिवली आणि विक्रोळी येथे प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यात आले. उमेदवारांचे प्रशिक्षण ५ जानेवारी २०२४ रोजी पर्यंत होते. प्रशिक्षणात ५५५ पैकी ४५९ उमेदवार पास झाले. जे प्रशिक्षणात अनुत्तीर्ण झाले त्यांना पुन्हा दुसऱ्या टप्प्याच्या प्रशिक्षणात वाढीव प्रशिक्षण देण्यासाठी समाविष्ट करण्यात आले आहे. डिसेंबर २०२३ पासून दुसऱ्या टप्प्यातील ३५५ उमेदवारांना अग्निशमन दलाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झालेली आहे. येत्या मे २०२४ मध्ये प्रशिक्षण संपणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना कामावर घेण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात प्रशिक्षणात उत्तीर्ण झालेल्या ४५९ पुरुष आणि महिला उमेदवारांना २३ जानेवारी २०२४ पासून अग्निशमन दलाच्या सेवेत दाखल करण्यात आले आहे. या सर्व उमेदवारांना अग्निशमन दलाच्या ३५ फायर स्टेशन आणि कंट्रोल रूममध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांनी सांगितले.