
खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने आणि सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने कर्जदरात (एमसीएलआर) गुरुवारी वाढ केली. एचडीएफसी बँकेने कर्जदरात ०.२० टक्का वाढ केली असून कॅनरा बँकेने ०.१० टक्क्याने कर्जदर वाढवला आहे. त्यामुळे बँकांची गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जांचा व्याजदर वाढणार आहे. त्याशिवाय मासिक हप्त्याचा भार देखील वाढणार आहे.
एचडीएफसी बँकेने ७ जुलै रोजी एमसीएलआर ०.२० टक्क्यांची वाढ केली. एचडीएफसी बँकेने वेबसाईटवर सुधारित व्याजदर जाहीर केले आहेत. त्यानुसार एका दिवसासाठी कर्जदर (एमसीएलआर) ७.७० टक्के झाला आहे. यापूर्वी तो ७.५० टक्के होता. एका महिन्यासाठी ७.७५ टक्के, तीन महिन्यांसाठी ७.८० टक्के, सहा महिन्यांसाठी ७.९० टक्के, एक वर्षासाठी ७.०५ टक्के राहील. दोन वर्षांसाठी ८.१५ टक्के आणि तीन वर्षांहून अधिक कालावधीसाठीचा कर्जाचा दर ८.२५ टक्के इतका वाढला आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने 'एमसीएलआर'मध्ये ०.१० टक्के वाढ केली आहे. बँकेच्या संकेतस्थळानुसार एक दिवसासाठीचा कर्जदर ६.७५ टक्के इतका झाला आहे. तीन महिन्यांसाठीचा दर ७.०५ टक्के आणि सहा महिन्यांसाठीचा एमसीएलआर दर ७.४५ टक्के झाला आहे. एक वर्ष मुदतीच्या कर्जासाठी आता कर्जदर ७.५० टक्के झाला आहे. वैयक्तिक कर्जांसाठी एक वर्षासाठीचा एमसीएलआर दर लागू होतो. नवे कर्जदर आज, गुरुवार ७ जुलै २०२२ पासून लागू झाले असल्याचे कॅनरा बँकेने म्हटले आहे. एचडीएफसी बँकेने यापूर्वी ७ जून रोजी एमसीएलआर दर ०.३५ टक्क्यांनी तर ७ मे रोजी ०.२५ टक्के वाढ केली होती.