
मुंबई : सध्या पितृपक्ष सुरू आहे. त्यामुळे भाज्यांची मागणी वाढली आहे. परिणामी गेल्या आठवड्याभरात भाज्यांच्या दरात १० ते १५ टक्के वाढ झाली. या पितृपक्षात बहुतांशी लोक मांसाहार करत नाहीत. त्यामुळे भाज्यांची मागणी वाढली आहे. दरवर्षी हे घडत असते, असे एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात पाऊस माघारी गेला आहे. त्याचा परिणाम भाज्यांच्या पुरवठ्यावर झाला आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अनपेक्षित पाऊस पडला. त्यामुळे नाशिक, पुणे व अन्य भाज्या उत्पादक क्षेत्रात भाज्यांच्या पिकांचे नुकसान झाले. तसेच गणेशोत्सवामुळे गावागावातून भाज्या येण्याचे प्रमाण सध्या कमी आहे, असे एका व्यापाऱ्याने सांगितले.
सध्या पालेभाज्यांचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे कोथिंबीर, पालक, मेथी आदींचे प्रमाण घटले आहे. कोथिंबीरची जुडी ३० रुपयांवर गेली आहे, तर फ्लॉवर, भोपळी मिरची, हिरवा वाटाणा आदींचे दर दुप्पट झाले आहेत.
एपीएमसी कार्यालयाने सांगितले की, भाज्याच्या पुरवठ्यात सध्या २० टक्के घट झाली आहे. मुंबई एपीएमसीत रोज भाज्यांच्या ५०० ते ६०० ट्रक येतात. गेल्या आठवड्यात हेच प्रमाण ४५० ते ५०० वाहनांपर्यंत घसरले आहे. भाज्या अत्यंत नाशवंत असतात. विशेषत: वाहतुकीत भाजीपाला खराब होत असतो.