मान्सून सुरू होताच पावसाळी पर्यटनाला उधाण

शहरातील महाविद्यालये आणि इतर कट्ट्यांवर एक दिवसाच्या सहलींसाठी तयारी सुरू झाली आहे
मान्सून सुरू होताच पावसाळी पर्यटनाला उधाण

ढगांचा गडगडाट, थंडगार वातावरण, मातीचा सुगंध आणि बहरलेला निसर्ग हे सर्वकाही जुळून येते ते पावसाळ्यातच. सर्वांना हवाहवासा वाटणारा पावसाळा म्हटलं की, पावसाळी सहलींचे वेध हे लागणारच. आजूबाजूच्या परिसरात अथवा पर्यटन-स्थळांवरील डोंगरदऱ्‍‌यातून वाहणारे धबधबे, समुद्रकिनारे, धरण परिसर, गड-किल्ले, पर्यटकांना खुणावू लागले आहेत. यंदाही एकत्रितपणे कुटुंब अथवा मित्रपरिवारासोबत पर्यटक मोठ्या प्रमाणात पावसाळी सहलींसाठी नियोजन करत असल्याने अनेक पर्यटनस्थळे गर्दीने तुडुंब भरल्याचे पाहायला मिळत आहे.

पावसाळा सुरू होताच पावसाळी पर्यटनालाही उधाण येते. पावसाचे स्वागत करण्यासाठी आणि मनाला ताजंतवानं करण्यासाठी मान्सून स्पेशल ‘पिकनिक’चे नियोजन पर्यटकांकडून करण्यात येत आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे पावसाळी सहलींचा आनंद घेता आला नसल्याने आता पाऊस सुरू होताच पर्यटकांना सहलींचे वेध लागले आहेत. शहरातील महाविद्यालये आणि इतर कट्ट्यांवर एक दिवसाच्या सहलींसाठी तयारी सुरू झाली आहे. तर अनेक कुटुंबे, मित्रपरिवार २-३ दिवसांच्या शॉर्ट अॅण्ड स्वीट सहलींचे नियोजन करत आहेत.

यामध्ये ठाणे, नवी मुंबई, खोपोली परिसरातील ठिकाणांना विशेष पसंती देण्यात येत आहे. अगदी कॉलेजिअन्सपासून अनेक कुटुंबे, मित्रपरिवार ग्रुप पिकनिकचे नियोजनात व्यस्त आहेत. या सहलींमध्ये धबधबे हा त्यातला ‘फेव्हरेट स्पॉट’. म्हणूनच शनिवार-रविवारच्या सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची पावले धबधब्याकडे वळतात. तर काही पर्यटक कोकणातील निसर्गसौंदर्याकडे आकर्षित होत त्या ठिकाणी वळत आहेत. तेथील समुद्रकिनारी पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी तसेच आंबोली येथील धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in