बाळासाहेबांचे पुत्र म्हणून किती वर्षे ब्लॅकमेल करणार? रामदास कदम यांचा सवाल

‘‘उद्धवजींना जे मिळाले ते बाळासाहेबांचा मुलगा म्हणून आणि आदित्यला मिळाले ते उद्धव ठाकरेंचा मुलगा म्हणून
बाळासाहेबांचे पुत्र म्हणून किती वर्षे ब्लॅकमेल करणार? रामदास कदम यांचा सवाल

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात होते. शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसताना तुम्हाला बाळासाहेबांच्या विचारांची आठवण झाली नाही का? बाळासाहेबांचे पुत्र म्हणून किती वर्षे ब्लॅकमेल करणार, असा सवाल करत शिवसेनेचे शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

‘‘उद्धवजींना जे मिळाले ते बाळासाहेबांचा मुलगा म्हणून आणि आदित्यला मिळाले ते उद्धव ठाकरेंचा मुलगा म्हणून; पण पक्ष संघटना आम्ही वाढवली,’’ असे रामदास कदम यावेळी म्हणाले. ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवस-रात्र काम करत आहेत. मुख्यमंत्री कसा असावा शिंदे यांनी दाखवून दिले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजारपण तर दोन अडीच महिने होते; पण अडीच वर्षांत तीन वेळाच ते मंत्रालयात आले होते. यासाठी त्यांची गिनीज बुकामध्ये नोंद झाली,’’ अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर आपणदेखील महाराष्ट्रात वस्तुस्थिती सांगणार असल्याचे ते म्हणाले.

‘‘उद्धव यांच्याकडून आता सगळ्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत.उरलेल्या आमदारांना, शाखाप्रमुखांना ते भेटत आहेत. मग गेल्या अडीच वर्षात काय झाले होते,’’ असा सवाल करत आता उद्धव ठाकरे यांनी भावनात्मक डायलॉगबाजी थांबवावी, असा इशारा कदम यांनी दिला. 

खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोकणवासींसाठी गणपतीला गावी जाण्यासाठी ४०० मोफत बसेस सोडल्याबद्दल रामदास कदम यांनी त्यांचे कौतुक केले. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील व्यक्तीकडून असा उपक्रम पहिल्यांदाच घडत आहे. 

एकसे भले दो !

‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही अनुभवी आहेत. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय या सरकारने घेतला.

पोलिसांना १५ लाख रुपयांत घरे हा सगळ्यात चांगला आणि मोठा निर्णय तातडीने घेतला.

‘एक से भले दो’ याप्रकारे ते महाराष्ट्र विकासाचा गाडा पुढे नेत आहेत. त्याचा मला अभिमान वाटत आहे. हा मुख्यमंत्री आमचा आहे, ही भावना महाराष्ट्रातील जनतेची आहे,’’ अशा शब्दात रामदास कदम यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाची स्तुती केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in