लवकरच अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार; शिवसेनेच्या 'या' नेत्याचा दावा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असा दावा शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने केल्याने एकच खळबळ
लवकरच अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार; शिवसेनेच्या 'या' नेत्याचा दावा

"महाविकास आघाडीमध्ये मान दिला जात नसल्याने राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश करतील," असा खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. नुकतेच मविआकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये 'वज्रमूठ' सभा घेण्यात आली. याबद्दल बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, "कालच्या सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते उद्धव ठाकरेंची मजा घेण्यासाठी व्यासपीठावर बसले होते. हे तीनही पक्ष कधीच एकत्र राहू शकणार नाहीत. नाना पटोलेही या सभेला गैरहजर होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये आता एकवाक्यता उरलेली नाही. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात तसेच इतर काँग्रेस नेत्यांचे एकमेकांसोबत जमत नाही. अशातच ज्येष्ठ असूनही मान मिळत नसल्याने लोकसभा निवडणुकीआधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील." असा दावा त्यांनी केला.

याचसोबत संजय शिरसाट हे सुषमा अंधारेंसोबत सुरु असलेल्या वादाबद्दल सांगताना म्हणाले की, "आता माझ्यासाठी तरी सुषमा अंधारे हे प्रकरण संपले आहे. ती बाई सर्व प्रसिद्धीसाठी करत असते. तिला आता सर्वोच्च न्यायालयात जायचे आहे की राष्ट्रपतीकडे जायचे आहे, तो तिचा प्रश्न. त्यामुळे यावर मी आता काहीच बोलणार नाही," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. दरम्यान, संजय शिरसाट यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in