
मुंबई : मुंबई महानगरपालिका कर्तव्यदक्ष आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेत जितके हुशार, कर्तव्यदक्ष कर्मचारी आहेत, तितकेच हरहुन्नरी कलाकारही या कर्मचाऱ्यांमध्ये दडलेले आहेत. रोजचे काम सांभाळून आपल्यातील कला सादर करणे हे खूप मोठे आव्हान आहे. तुमच्यातील कलाकार असाच जिवंत ठेवा आणि आयुष्याचा आनंद घेत राहा, असे प्रतिपादन पद्मश्री तथा महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी केले.
बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभागाच्या विद्यमाने आयोजित ५३ व्या आंतरविभागीय खात्यांतर्गत नाट्यस्पर्धा २०२४ - २५ चा पारितोषिक वितरण समारंभ पद्मश्री व महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते विलेपार्ले येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
उप आयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, उप आयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, माजी उप आयुक्त किशोर क्षीरसागर आदीची उपस्थिती होती.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना सराफ म्हणाले की, मी अनेक कार्यक्रमांना जातो. वेगवेगळी स्नेहसंमेलने पाहतो. परंतु इतका रेखीव आणि नियोजनबद्ध कार्यक्रम मी याआधी पाहिला नाही. कर्तव्याची जाणीव असलेला प्रत्येक कर्मचारी जितका आपल्या कामाला न्याय देतो, तितकाच त्याने आज या रंगमंचावर आपल्या कलेला देखील न्याय दिला.
महानगरपालिकेत गुणी आणि कलासक्त कलावंत कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेचे सतत सहकार्य असते, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.
सर्व कर्मचारी गुणी आहेत. त्यांची उत्कृष्ट नाटके सादर होतात. पालिका एक विस्तृत कुटुंब आहे. यातील प्रत्येकाच्या प्रतिभेचा गौरव केला जातो, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.