

मुंबई : मुंबई महापालिकेच्या परिरक्षण चौक्यांमध्ये आवश्यक व पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असतानाही संबंधित अभियंत्यांकडून अपेक्षित दर्जाचे प्रभावी पर्यवेक्षण होत नसल्याच्या तक्रारी आहेत. २६ प्रशासकीय विभागांच्या सहायक आयुक्तांनी संबंधित परिरक्षण चौक्यांतील मनुष्यबळाचा सखोल आढावा घ्यावा. दगडी कडा दुरुस्ती, रस्ता दुभाजक दुरुस्ती, पदपथ दुरुस्ती यासारखी नियमित व लहान-मोठी देखभाल दुरुस्तीची कामे पालिकेच्या मनुष्यबळामार्फतच करावीत. दैनंदिन देखभाल-दुरुस्ती कामासाठी कंत्राटदार अवलंबून राहाणे कमी करून पालिकेच्या आस्थापनेवरील कामगारांचा अधिक परिणामकारक व कार्यक्षम वापर करावा, असे स्पष्ट निर्देश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी प्रशासनाला दिले.
मुंबई महानगरातील रस्ते देखभाल व दुरुस्ती कामांमध्ये नागरिकांना दृश्य स्वरूपात आणि सकारात्मक बदल जाणवेल, अशा पद्धतीने परिरक्षण विभागातील सहायक अभियंता, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांनी नियोजनबद्ध व उत्तरदायित्वपूर्ण कामकाज करावे, असे निर्देश भिडे यांनी दिले आहेत. आयुक्त अश्विनी भिडे यांनी बुधवारी सकाळी अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील घनकचरा व्यवस्थापन चौकी, विलेपार्ले टाटा कंपाऊंड येथील कीटकनाशक चौकी, बजाज मार्ग येथील परिरक्षण चौकी यांना भेट देऊन पाहणी केली. चौकीवरील स्वच्छता कर्मचाऱ्यांसमवेत संवाद साधत त्यांनी कामकाजाचे स्वरूप, वेळ आणि अडचणी जाणून घेतल्या. चौक्यांसह परिरक्षण व कीटकनाशक विभागांच्या चौक्या सुस्थितीत व सेवायुक्त कराव्यात, अशी सूचना त्यांनी केल्या.
कर्मचाऱ्यांची गैरहजेरी कमी करा !
भिडे यांनी कीटकनाशक नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध उपकरणांची पाहणी करत त्यांच्या कार्यपद्धतीची प्रात्यक्षिकासह माहिती कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतली. मूषक नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, चौकीवरील एकंदरीत कामकाज आदींबाबत सविस्तर माहिती घेत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंदवही आणि अन्य बाबींची पडताळणी केली. कर्मचारी गैरहजेरीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी नमूद केले.
तरंगता कचरा रोखण्यासाठी जाळ्या बसवा!
भिडे यांनी इर्ला नाला, एसएनडीटी नाला आणि गझधरबांध उदंचन केंद्र यांना प्रत्यक्ष भेट देऊन पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. पावसाळ्यापूर्वीच उदंचन केंद्रातील यंत्रणा सुसज्ज ठेवावी. पावसाचे पाणी साचण्याच्या ठिकाणी उपसा संच कार्यरत राहतील, याची दक्षता घ्यावी. जुहू येथील इर्ला पर्जन्यजल उदंचन केंद्र हे पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवावे, जेणेकरून मिलन भुयारी मार्ग, कूपर रुग्णालय परिसर, विलेपार्ले रेल्वे स्थानक तसेच जुहू-विलेपार्ले विकास क्षेत्रातील नागरिकांना पूरस्थिती पासून दिलासा मिळेल तसेच जुहू समुद्रकिनाऱ्याकडे वाहून जाणारा घनकचरा व तरंगता कचरा रोखण्यासाठी यांत्रिक जाळी प्रणाली म्हणजेच बॅक/फ्रंट बार स्क्रीनचा प्रभावी वापर करावा, असे स्पष्ट निर्देश भिडे यांनी दिले.