आरे-बीकेसी पहिला टप्पा मे अखेरपर्यंत सेवेत

पहिल्या टप्प्याचे ९४.७ टक्के काम पूर्ण : ‘भूमिगत मेट्रो-३’ प्रकल्पाचे ८९.५ टक्के काम फत्ते
आरे-बीकेसी पहिला टप्पा मे अखेरपर्यंत सेवेत

गिरीश चित्रे/मुंबई

मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मेट्रो रेल्वेचे जाळे विस्तारले जात आहे. देशातील सर्वात लांब ‘भूमिगत मेट्रो-३’ प्रकल्पाचे ८९.५ टक्के काम फत्ते झाले आहे. आरे-बीकेसी पहिल्या टप्प्यातील काम ९४.७ टक्के पूर्ण झाले असून मे अखेरपर्यंत पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन असल्याचे ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले.

मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी व प्रवाशांना जलदगतीने प्रवास करता यावा यासाठी घाटकोपर ते वर्सोवा पहिली मेट्रो रेल धावली, तर चेंबूर भक्ती पार्क ते करी रोड दरम्यान ‘मोनो रेल’ प्रवासी सेवेत दाखल झाली. कोस्टल रोड प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या नेतृत्वाखाली आता ‘मेट्रो रेल-३’चे जाळे विस्तारले जात आहे. ‘मेट्रो रेल-३’च्या प्रत्यक्ष कामाला ऑक्टोबर २०१६ पासून सुरुवात झाली. कोलकाता, दिल्ली व चेन्नई येथे यापूर्वीच भूमिगत मेट्रो रेल प्रवासी सेवेत आहे. मात्र, भारतातील सर्वात लांब भूमिगत रेल मुंबईतील असणार आहे. या मेट्रो रेल प्रकल्पात एकूण २६ स्थानके असून ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३’ मार्गिकेतील पहिले स्थानक कफ परेड तर शेवटचे स्थानक आरे आहे. २६ स्थानकांपैकी आरे हे एक स्थानक जमिनीवर असून बाकी सर्व स्थानके भूमिगत असणार आहेत. विशेष म्हणजे बीकेसी ते आरे या १२.४४ किमीच्या पहिल्या टप्प्यातील ९४.७ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मेअखेरपर्यंत आरे-बीकेसी पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन असल्याचे अश्विनी भिडे यांनी सांगितले.

संपूर्ण प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन

‘मुंबई मेट्रो रेल-३’ हा संपूर्ण प्रकल्प डिसेंबर अखेरपर्यंत प्रवासी सेवेत आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. ‘मेट्रो-३’ प्रकल्पावर एकूण ३७,२७६ कोटी रुपये इतका खर्च होणार आहे.

उपनगरीय रेल्वे स्थानकांशी अंतर्गत जोडणी

सीएसएमटी मेट्रो स्थानक - सीएसएमटी मध्य व हार्बर रेल्वे स्थानक, ग्रँट रोड मेट्रो स्थानक - ग्रँट रोड पश्चिम रेल्वे स्थानक, मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानक - मुंबई सेंट्रल पश्चिम रेल्वे स्थानक आणि एसटी बस डेपो, महालक्ष्मी मेट्रो स्थानक - महालक्ष्मी मोनोरेल स्थानक, दादर मेट्रो स्थानक - दादर पश्चिम रेल्वे स्थानक, बीकेसी मेट्रो स्थानक - मेट्रो मार्ग-२बी (डी. एन. नगर - मंडाले), मरोळ नाका - मेट्रो मार्ग-१ (घाटकोपर ते वर्सोवा)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in