सत्ताधारी, विरोधक दोघांनाही प्रश्न विचारा! मराठवाड्यातील जनतेला राज ठाकरेंचा सल्ला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुक्ती संग्रामाच्या दिनाच्या मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत
सत्ताधारी, विरोधक दोघांनाही प्रश्न विचारा! मराठवाड्यातील जनतेला राज ठाकरेंचा सल्ला

मुंबई : मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस हा संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा. कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. एकाने आश्वासनं द्यायची आणि त्यावर दुसऱ्यांनी टीका करायची आणि टीका करणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना नक्की काय केलं याचा विचार करायचा नाही, हे सुरू राहणार असेल तर मराठवाड्यातील जनतेने आता दोघांनाही प्रश्न विचारायची वेळ आली आहे, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडले आहे. मी मागच्या वेळेस म्हटलं होतं तसं तुम्ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्यावर ही वेळ ज्यांनी आणली त्या ‘सजा’कारांना शिक्षा द्या, असे आवाहन करत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुक्ती संग्रामाच्या दिनाच्या मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठवाड्यातील दुष्काळसदृश स्थिती, राज्य मंत्रिमंडळाची संभाजीनगर येथे झालेली बैठक, त्यात जाहीर झालेले पॅकेज. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टीकाटिप्पणी सुरू असताना राज ठाकरे यांनी मराठवाड्यातील जनतेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्या देतानाच त्यांनी राज्य सरकार आणि महाविकास आघाडी या दोघांवरही शरसंधान साधले आहे. फक्त ‘फोटो-ऑप’ म्हणून कार्यक्रम साजरे करणे किंवा मराठवाड्यात येऊन आश्वासनांची खैरात वाटणे, म्हणजे हा दिवस साजरा केला, असं मानून चालणार नाही. पुरेशा पाण्यासाठी मराठवाड्याचा झगडा गेली कित्येक दशके सुरू आहे आणि यावेळेला मराठवाडा क्षेत्रांत पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे पुढच्या काही महिन्यांत पाण्यासाठीची वणवण बघायला मिळणार आहे. अशावेळेस एकाने आश्वासनं द्यायची आणि त्यावर दुसऱ्यांनी टीका करायची आणि टीका करणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना नक्की काय केलं, याचा विचार करायचा नाही, हे सुरू राहणार असेल तर मराठवाड्यातील जनतेने आता दोघांनाही प्रश्न विचारायची वेळ आली आहे.

तुमचा लढा तोंडाला पानं पुसण्यासाठी नव्हता

तुम्ही जो लढा दिलात, तो काही तुमच्या तोंडाला कोणीतरी पानं पुसावीत म्हणून नव्हता याचं स्मरण राहू दे आणि तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच ती वेळ आहे. त्यासाठी निर्धार करण्याचा आजचा हा दिवस आहे, असे राज ठाकरे एक्सवरून प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in