
मुंबई : ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजने’साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शुल्क आकारणाऱ्याविरोधात पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. पालिकेच्या एम-पूर्व चेंबूर विभागात या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी नागरिकाकडे शुल्काची मागणी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात प्रशासनाच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, पोलिसांनी सदर व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून नुकतीच ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याच प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र महिलांकडून प्रती अर्ज १०० रुपये शुल्क खासगी व्यक्ती घेत असल्याची माहिती सहायक आयुक्त (एम-पूर्व) अलका ससाणे यांना प्राप्त झाली. याबाबत त्यांनी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांना अवगत केले असता, डॉ. शिंदे यांनी या प्रकरणी तत्काळ पोलिसांत तक्रार करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या निर्देशानुसार, नागरिकांची दिशाभूल करून पैसे उकळत असल्याप्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात सोमवारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.