खड्डेमुक्त रस्त्यांसाठी डांबराचा पुनर्वापर; पालिका इन्फ्रारेड मशिनची करणार खरेदी

मुंबईच्या रस्त्यांना खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेने हजारो कोटी रुपये मातीत घातले. मात्र, मुंबई खड्डेमुक्त झाली नाही. त्यामुळे पालिका प्रशासन पुन्हा एकदा मुंबई खड्डेमुक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. डांबरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसाठी डांबरावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा नवीन प्रयोग पालिका करणार आहे. यासाठी पालिका इन्फ्रारेड मशिन खरेदी करणार असून त्यासाठी साडेसात कोटी खर्चणार आहे.
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी डांबराचा पुनर्वापर; पालिका इन्फ्रारेड मशिनची करणार खरेदी
Published on

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांना खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेने हजारो कोटी रुपये मातीत घातले. मात्र, मुंबई खड्डेमुक्त झाली नाही. त्यामुळे पालिका प्रशासन पुन्हा एकदा मुंबई खड्डेमुक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. डांबरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसाठी डांबरावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा नवीन प्रयोग पालिका करणार आहे. यासाठी पालिका इन्फ्रारेड मशिन खरेदी करणार असून त्यासाठी साडेसात कोटी खर्चणार आहे. यामुळे मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे भरण्यास मदत होणार आहे. तसेच त्याठिकाणी पुन्हा खड्डा पडणार नाही, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबई महापालिकेकडून खड्डे बुजवण्याच्या मोहिमेला सुरुवात केली जाते. ऑक्टोबर महिन्यापर्यंत खड्डे बुजवण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जातो. पण रस्त्यावरील खड्डे काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. तसेच पहिल्याच पावसात पालिकेच्या कामांची पोलखोल होते.

मुंबईच्या रस्त्यांवर २४ हजारांहून अधिक खड्डे हे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर असल्याचे निदर्शनास आले आहे. तर मालाड, अंधेरी, दादर, माहीम, प्रभादेवी, परळ, लालबाग, चेंबूर, मानखुर्द, टिळकनगर, अणुशक्ती नगर, भायखळा आदी भागांतही रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला खड्डेमुक्त करण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. तेव्हा पावसाळ्याच्या मुहूर्तावर पालिका प्रशासनाकडून रात्रीच्या वेळी खड्डे बुजवले जात होते. परंतु सकाळी पडलेल्या पावसामुळे खड्ड्यात भरलेली माती वाहून जात होती. त्यामुळे मुंबईकरांना रस्त्यावरील खड्ड्यांच्या बाबतीत जैसे थे च्याच परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. या खड्ड्यांतूनच मुंबईकरांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे अनेकजण याबाबत नाराजी व्यक्त करतात. रस्त्यांवरील हे खड्डे बुजविण्यासाठी पालिकेला कसरत करावी लागते. मात्र तरीही दरवर्षी मुंबईतील रस्ते खड्डेमय झालेले पाहायला मिळतात.

खड्ड्यांसाठी पालिकेचा नवा प्रयोग

डांबरी रस्त्यावर खड्डे पडले तर त्याच डांबरावर पुनर्प्रक्रिया करून खड्डे बुजवले जाणार आहेत. यासाठी रिसायकलिंग मशीनची खरेदी केली जाणार आहे. या मशीनने खड्डे बुजवण्यासोबतच तडे किंवा चिरा, तुटलेल्या कडा आदी दुरुस्ती केली जाणार आहे. या मशीनच्या मदतीने जुने पुनरुत्पादित केलेले हॉट मिक्स डांबर मिश्रण आणि नवीन हॉट मिक्स डांबर मिश्रण इन्फ्रारेड मशीनमधील किरणाद्वारे समान तापमानावर आणून त्यावर प्रक्रिया करून खड्डे बुजवले जाणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in