जलतरणपटू होण्यासाठी तेराशेहुन अधिक मुंबईकर ; पालिकेच्या जलतरण तलावात २१ दिवसांचे प्रशिक्षण

मुंबई महापालिकेच्या जलतरण तलावात इच्छुकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, प्रशिक्षणासाठी १,३६६ अर्ज प्राप्त झाले
जलतरणपटू होण्यासाठी तेराशेहुन अधिक मुंबईकर ; पालिकेच्या जलतरण तलावात २१ दिवसांचे प्रशिक्षण

सृदृढ आरोग्यासाठी स्विमिंग हा उत्तम पर्याय आहे. मुंबई महापालिकेच्या जलतरण तलावात इच्छुकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, प्रशिक्षणासाठी १,३६६ अर्ज प्राप्त झाले आहेत. स्विमिंग शिकण्याची आवड असणाऱ्यांना २१ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात २ मेपासून प्रशिक्षणाचा पहिला टप्पा सुरू झाला असून, दुसरा टप्पा २३ मे पासून सुरू होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मुंबईत विविध खासगी संस्थांद्वारे १५ दिवसांच्या जलतरण प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यासाठी साधारणपणे सहा हजार रुपयांपर्यंत शुल्क असते. या अनुषंगाने माफक शुल्कात म्हणजेच पंधरा वर्षांपर्यंत रुपये दोन हजार, तर त्या पुढील वयोगटासाठी रुपये तीन हजार एवढ्या शुल्कात २१ दिवसांचे प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. खासगी संस्थांच्या तुलनेत पालिकेने शुल्क कमी आणि प्रशिक्षणाचे दिवस जास्त ठेवले आहेत. महापालिकेच्या सहा जलतरण तलावांमध्ये २ मे पासून प्रशिक्षणाला सुरूवात झाली असून, ते २२ मे पर्यंत चालणार आहे.

जलतरण प्रशिक्षण हे दररोज दुपारी १२.३० ते १.३० तसेच दुपारी २ ते ३ आणि ३.३० ते ४.३० अशा तीन कालावधीत २१ दिवस आहे. १५ प्रशिक्षणार्थींच्या मागे प्रत्येकी एक प्रशिक्षक नेमण्यात आला आहे. २ मे पासून सुरू झालेल्या पहिल्या बँचसाठी १ हजार १७० जणांनी नोंदणी केली आहे. यामध्ये दिव्यांग सभासदांनाही दोन हजार रूपये शुल्क आकारणी करण्यात येत आहे. दुसरी बँच ही २३ मे पासून ते १२ मे पर्यंत चालणार आहे. याची नोंदणी सुरू असून, १९६ जणांनी नोंदणी केल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. ही नोंदणी अद्यापही सुरूच आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्टया असून, त्यामुळे अनेकांनी बाहेरगावी जाणे पसंत केल्यानेच जलतरण प्रशिक्षणाला काहीसा अल्प प्रतिसाद मिळाल्याची शक्यता आहे.

या जलतरण तलावात प्रशिक्षण

-दादर (पश्चिम) महात्मा गांधी स्मा.जलतरण तलाव- ५१३

-चेंबूर (पूर्व)जनरल अरूणकुमार वैद्य जलतरण तलाव- ३२१

-कांदिवली (पश्चिम)सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलाव-१४३

-मालाड (पश्चिम)मुंबई पालिका जलतरण तलाव-६५

-दहिसर (पूर्व) श्री.मुरबाळीदेवी जलतरण तलाव-६५

-दहिसर (पश्चिम) मुंबई पालिका जलतरण तलाव-६३

logo
marathi.freepressjournal.in