मिरा-भाईंदर : मीरा-भाईंदर-वसई विरार (एमबीव्हीव्ही) पोलिसांच्या क्राइम ब्रांच युनिट (झोन तीन) ने विरार आणि परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या २८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. अमित नत्थू शंवर (वय २८) असे आरोपीचे नाव असून उल्लेखनीय म्हणजे त्याला पोलिस बनायचे होते. राज्य सरकारने नुकत्याच मुंबईत घेतलेल्या मेगा पोलिस भरतीचाही त्याने अर्ज भरला होता. पण, कॉन्स्टेबलच्या भरतीत तो अपयशी ठरल्याचे समोर आले आहे.
दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांद्वारे सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एमबीव्हीव्हीचे प्रमुख मधुकर पांडे यांनी गुन्हेगारांना पकडण्याची जबाबदारी गुन्हे शाखेच्या युनिटवर सोपवली होती. खबऱ्यांनी दिलेली माहिती आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपलेल्या फुटेजच्या आधारे क्राइम ब्रांचच्या पथकाला संशयिताची माहिती मिळाली आणि त्यांनी शनिवारी डहाणूतील तलासरी परिसरातून त्याला अटक केली.
प्रेयसीसोबत लग्नासाठी करायची होती पैशांची जमवाजमव
आरोपी दुचाकीवर हेल्मेट घालून नागरिकांचा-विशेषत: महिला दुचाकीस्वारांचा पाठलाग करायचा आणि गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून सुसाट दुचाकी पळवून गायब व्हायचा. अचानक झालेल्या या प्रकारामुळे दुचाकीचालक एकतर तोल जाऊन पडायचा किंवा कसेबसे नियंत्रण मिळवायचे. "दीर्घकाळापासून असलेल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी आवश्यक असलेल्या पैशांची व्यवस्था करता येईल म्हणून अलीकडेच चेन स्नॅचिंग करायला लागल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले", अशी माहिती क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी दिली.
वितळलेले सोने आणि दुचाकी जप्त
विरार, अर्नाळा कोस्टल आणि नालासोपारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोनसाखळी चोरीच्या चार गुन्ह्यांमध्ये आरोपीचा सहभाग असल्याची कबुली त्याने दिली. या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्याबरोबरच आरोपीच्या ताब्यातून चोरीची साखळी व वितळलेले सोने असा एकूण ४ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्यावर भादंवि कलम ३९२ (दरोडा) अन्वये गुन्हा दाखल करून कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.