पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; आरोपीस अटक

अर्धनग्न अवस्थेत या तरुणाने पोलीस ठाण्यात धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला होता
पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; आरोपीस अटक

मुंबई : पोलीस ठाण्यात प्रवेश करून तिथे उपस्थित पोलिसांना शिवीगाळ करून एका पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी २३ वर्षांच्या आरोपी तरुणाला मालवणी पोलिसांनी अटक केली. इम्रान कमाल सय्यद असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध पोलिसांशी हुज्जत घालून, शिवीगाळ करुन मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

सचिन शिवाजीराव म्हस्के हे कांदिवलीतील चारकोप, एकतानगर परिसरात राहत असून, मालवणी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करतात. रविवारी ११ जूनला ते दिवसपाळीवर ठाणे अंमलदार म्हणून कार्यरत होते. याच दरम्यान तिथे एक तरुण आला आणि तिथे उपस्थित पोलिसांना अश्‍लील शिवीगाळ करू लागला. अर्धनग्न अवस्थेत या तरुणाने पोलीस ठाण्यात धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याला पोलिसांनी शांत करुन समजविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने उपनिरीक्षक सचिन म्हस्के यांचे केस पकडून त्यांच्या गुप्त जागेवर जोरात लाथ मारली. त्यांचे बेल्ट खेचण्याचा प्रयत्न करू लागला. त्यात त्यांना दुखापत झाली होती. अचानक घडलेल्या या प्रकाराने तिथे उपस्थित पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करुन या तरुणाला ताब्यात घेतले होते. चौकशीअंती त्याचे नाव इम्रान सय्यद असल्याचे उघडकीस आले. या घटनेनंतर सचिन म्हस्के यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी इम्रानविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे व अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in