मुंबई : कुर्ला पश्चिम येथील पालिकेच्या कुर्ला भाभा रुग्णालयात परिचारिकेला रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. परिचारिकेला केलेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी रुग्णालयातील परिचारिकांनी गुरुवारी सकाळपासून काम बंद आंदोलन केले. रुग्णालयात सकाळीच काम बंद आंदोलन झाल्याने रुग्णसेवा कोलमडली. दरम्यान, कुर्ला भाभा रुग्णालयाचे मेडिकल सुप्रिटेंडंट यांच्या उपस्थितीत झालेल्या कर्मचारी प्रतिनिधींच्या बैठकीत रुग्णालायात आवश्यक सुरक्षा व्यवस्था देण्याच्या आश्वासनानंतर दोन ते तीन तासांनी आरोग्य सेवा पूर्ववत झाली.
कुर्ला पश्चिम येथे पालिकेचे भाभा रुग्णालय आहे. या रुग्णालयात बाह्य तपासणीसाठी रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात. बुधवारी रात्री रुग्णालयात सफाईचे काम सुरू असताना एका रुग्णाचे नातेवाईक त्याठिकाणी आले असता, उपस्थित परिचारिकाने त्यांना थोडावेळ थांबण्यास सांगितले; मात्र नातेवाईकांनी परिचारिकेलाच दमदाटी करत कानाखाली मारली. या प्रकारानंतर रुग्णालयातील वातावरण तापले आणि एकच आरडाओरडा झाली. रुग्णालय प्रशासनाला घडल्या प्रकाराची माहिती दिली; मात्र प्रशासनाने काहीच दखल न घेतल्याने परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आणि गुरुवारी सकाळी ७.३० वाजता काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले. परंतु काम बंद आंदोलनाची माहिती रुग्णालयात येणाऱ्यांना नसल्याने रुग्णांची एकच गर्दी झाली.
दरम्यान, सर्वच परिचारिका- कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेत जोरदार घोषणाबाजी करीत मारहाणीचा निषेध केला. मारहाण करणाऱ्या नातेवाईकांवर एफआयआर नोंदवून कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, मारहाणीच्या घटनेची दखल घेत दोषींवर कठोर कारवाई व्हावी, सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी यासाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम व चिटणीस अजय राऊत यांनी अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांना पत्र दिले आहे.