विनयभंगाच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड सपा पदाधिकार्‍याची संपत्ती जप्त होणार

१२ सप्टेंबरपर्यंत त्याने आत्मसमर्पण करावे
विनयभंगाच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड सपा पदाधिकार्‍याची संपत्ती जप्त होणार

मुंबई :एका अल्पवयीन मुलीचे व्हॉटअप कॉलदरम्यान अश्‍लील फोटो काढून ते फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केल्याप्रकरणी समाजवादी पार्टीचा पदाधिकारी आसिफ सिद्धीकीची लवकरच संपत्ती जप्त केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून आसिफ हा विनयभंगासह पोक्सोच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असून त्याने १२ सप्टेंबरपर्यंत आत्मसमर्पण केले नाहीतर त्याच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान त्याच्या कार्यालयात उत्तरप्रदेश पोलिसांनी वॉरंट बजावले आहे. तक्रारदार मुलगी ही अल्पवयीन असून ती उत्तरप्रदेशच्या अलाहाबादची रहिवाशी आहे. दोन वर्षांपूर्वी तिची आसिफशी सोशल मिडीयावरुन ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. आसिफ हादेखील अलाबादचा रहिेवाशी असून तो तक्रारदार मुलीच्या कुटुंबियांच्या परिचित आहेत. मुलीचे वडिल अलाहाबाद येथील उच्च न्यायालयात वकिल म्हणून काम करतात. तिच्याशी व्हिडीओ चॅटदरम्यान त्याने तिचे अश्‍लील फोटो घेतले होते. त्याचे स्क्रिनशॉट काढून त्याने तिचे फोटो तिच्या आईला पाठविले होते. ते फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या आईकडे पैशांची मागणी केली होती. या प्रकारानंतर त्यांनी उत्तरप्रदेशातील स्थानिक पोलिसांत आसिफ सिद्धीकीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह खंडणीसाठी धमकी देणे या भादवीसह आयटी आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत गेल्या दोन वर्षांपासून आसिफ हा वॉण्टेड आरोपी आहे. चौकशीसाठी समन्स बजावून आसिफ हा हजर राहिला नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध स्थानिक पोलिसांनी वॉरंट जारी केले आहे. त्याच्या अटकेसाठी दोन दिवसांपूर्वीच उत्तरप्रदेश पोलिसांचे एक विशेष पथक मुंबईत दाखल झाले होते. आसिफ हा दक्षिण मुंबईतील पठाणवाडीचा रहिवाशी आहे. त्यामुळे त्याचा जे. जे मार्ग आणि भायखळा परिसरात पोलिसांनी शोध घेतला, मात्र तो पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे त्यााच्याविरुद्ध न्यायालयाने काढलेले वॉरंट त्याच्या कार्यालयात बजाविण्यात आले आहे. १२ सप्टेंबरपर्यंत त्याने आत्मसमर्पण करावे, अन्यथा त्याच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in