
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. यासाठी २०१७ -१८, २०१८-१९ आणि २०१९-२० हा कालावधी विचारात घेण्यात येईल.
२०१७ या वर्षांत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज ३० जून २०१८पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास आणि २०१८ -१९ या वर्षांतील अल्पमुदत पीक कर्ज ३० जून २०१९पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास त्याचप्रमाणे २०१९-२० या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास २०१९-२० या वर्षातील अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येईल.
मात्र, २०१९ -२० या वर्षातील घेतलेल्या आणि त्याची पूर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम ५० हजारांपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल.