

वसई : विरार येथील बहुचर्चित रमाबाई अपार्टमेंट दुर्घटना प्रकरणात वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस यांना पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अटक केली. शुक्रवारी त्यांना वसई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रमाबाई अपार्टमेंट दुर्घटना प्रकरणात ऑक्टोबर महिन्यातच गोन्साल्विस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अवघ्या दीड महिन्यांवर त्यांची सेवानिवृत्ती असताना ही कारवाई करण्यात आली आहे. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू, तर ९ जण गंभीर जखमी झाले होते.
विरार पूर्वेकडील विजय नगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट ही बेकायदा चार मजली इमारत २६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री कोसळली. इमारतीत सुमारे ५० सदनिका होत्या. या दुर्घटनेप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात बिल्डर नितल साने, जागा मालकांसह पाच जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात असे निष्पन्न झाले की, मे २०२५ मध्ये इमारत धोकादायक असल्याने सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस यांनी नोटीस बजावली होती.
धोकादायक इमारत रिकामी करून एमआरटीपी कायद्यानुसार बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करणे ही त्यांची जबाबदारी होती.
इतर अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू
या प्रकरणात उपलब्ध पुरावे व जबाबांच्या आधारे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, अन्य महापालिका अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी दिली. नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारत प्रकरणात ईडीने कारवाई करत तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार, नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी, तसेच बिल्डर सीताराम व अरुण गुप्ता यांना अटक केली होती. या पार्श्वभूमीवर रमाबाई अपार्टमेट दुर्घटनेतील ही अटक महत्त्वाची मानली जात आहे. येत्या दीड महिन्यांत गोन्साल्विस यांची सेवानिवृत्ती होणार होती.