वर्षाच्या सुरुवातीलाच राणी बागेत झालेल्या गर्दीने महसूल लाखोंमध्ये जमा

१ जानेवारी २०२३ या पहिल्याच दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन ३२ हजार ८२० पर्यटकांनी शक्ती करिश्मा पेंग्विनची धमाल मस्ती अनुभवली
वर्षाच्या सुरुवातीलाच राणी बागेत झालेल्या गर्दीने महसूल लाखोंमध्ये जमा

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत हे शनिवार व रविवारी म्हणजे दोन्ही दिवस सलग सुट्टी. सलग सुट्टी आल्याने पर्यटकांनी रविवारी राणी बागेला पसंती दिली. रविवार, १ जानेवारी २०२३ या पहिल्याच दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन ३२ हजार ८२० पर्यटकांनी शक्ती करिश्मा पेंग्विनची धमाल मस्ती अनुभवली. एका दिवशी राणी बागेच्या तिजोरीत १३ लाख ७८ हजार ७२५ रुपये महसूल जमा झाला आहे. दरम्यान, ६ नोव्हेंबर रोजी ३१,८४१ पर्यटकांनी भेट दिली होती आणि त्यादिवशी ११ लाख १२ हजार ९२५ रुपये महसूल मिळाला होता.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय बच्चेकंपनीसह मोठ्यांचे आकर्षण आहे. देशविदेशातील पर्यटक राणी बागेला आवर्जुन भेट देतात. नाताळ असल्याने शाळांना सुट्टी आहे. तर नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक मुंबईकरांनी सुट्टी टाकली होती. शनिवार, रविवार सलग सुट्टी आल्याने पर्यटकांनी प्राणीसंग्रहालयातील पशुपक्ष्यांची धमाल मस्ती अनुभवली. १ जानेवारी २०२३ रोजी ऑफलाईन २७ हजार २६२ पर्यटकांनी तर ऑनलाईन ५,५५८ पर्यटकांनी राणी बागेला भेट दिली. ऑफलाईन पर्यटकांच्या माध्यमातून ९ लाख ६० हजार ७२५ रुपये महसूल मिळाला असून ऑनलाईन पर्यटकांच्या माध्यमातून ४ लाख १८ हजार रुपये महसूल मिळाला आहे.‌

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in