राज्यातील धरणांमध्ये मे अखेर ३६.६८ टक्के जलसाठा शिल्लक
राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पात २५ मेअखेर ३६.६८ टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या याच काळात हे प्रमाण ३६.२७ टक्के एवढे होते. तसेच राज्यातील टंचाईग्रस्त भागात ४०१ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
राज्यातील उपलब्ध जलसाठ्यातून नागरिकांना सुरळितपणे पाणीपुरवठ्यासाठी शासन जलसाठयाचे नियोजन करत आहे. यासाठी वेळोवळी जलसाठ्याचा आढावा घेऊन नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उपायोजना राबविण्यात येत आहेत. सध्या राज्यात धरणातील जलसाठ्याचा विचार करता अमरावती विभागात १९२४ दशलक्ष घनमीटर म्हणजे विभागाच्या एकूण साठ्याच्या ४७.२२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. यापाठोपाठ मराठवाडा विभागात ३ हजार ३२७ दशलक्ष घननीटर म्हणजे ४५.१३ टक्के, कोकण विभागात १५६७ दलघमी म्हणजे ४४.६५ टक्के, नागपूर विभागात १६२० दलघमी म्हणजे ३५.१८ टक्के, नाशिक विभागात २१३८ दलघमी म्हणजे ३५.६२ टक्के तर पुणे विभागात ४३८१ दलघमी म्हणजे २८.८ टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे.
टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. याअंतर्गत टंचाईग्रस्त गावे, वाड्यांना आवश्यकतेनुसार टँकर्सद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यात कोकण विभागात १५५ गावांना आणि ४९९ वाड्यांना १०१ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. नाशिक विभागात ११७ गावे, १९९ वाड्यांना १०२ टँकर्स, पुणे विभागात ७१ गावे आणि ३६० वाड्यांना ७० टँकर्स, औरंगाबाद विभागात ४३ गावे, २३ वाड्यांना ५९ टँकर्स, अमरावती विभागात ६९ गावांना ६९ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नागपूर विभागात मे महिन्याअखेरीस देखील टँकर्सची आवश्यकता भासलेली नाही.