७५ वर्षांच्या वयोवृद्धाची ९६ लाखांची प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न

अंधेरीतील घटना; भाच्यासह पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
७५ वर्षांच्या वयोवृद्धाची ९६ लाखांची प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न

मुंबई - अंधेरी येथे राहणाऱ्या एका ७५ वर्षांच्या वयोवृद्धाची सुमारे ९६ लाखांची प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वयोवृद्धाचा भाचा जेकब मदारी आणि त्याची पत्नी पद्मा जेकब मदारी या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. येशुरत्नम जकरण्णा जंगम हे वयोवृद्ध त्यांचा मुलगा जोशवा याच्यासोबत अंधेरी परिसरात राहतात. त्यांच्या पत्नीचे कोरोना काळात मृत्यू झाला होता. हयात असताना ती रोजंदारीवर काम करून इतर महिलांना रोजगार मिळवून देत होती. त्यांच्या मालकीचे मालाडच्या मालवणी आणि अंधेरी परिसरात दोन फ्लॅट आहेत. त्यांना मूल नसल्याने त्यांनी जोशवाला दत्तक घेतले होते. पत्नीच्या निधनानंतर त्यांचे त्यांच्या मुलासोबत क्षुल्लक कारणावरून खटके उडत होते. या भांडणाला कंटाळून ते त्यांच्या शीव येथील बहिणीकडे निघून गेले होते. तिच्या बहिणीचा जेकब हा मुलगा असून पद्मा ही त्याची पत्नी आहे. ते दोघेही त्यांना त्यांच्या मुलाविषयी भडकावून तो त्यांचा सांभाळ करणार नाही. तुम्हाला मारून टाकेल, तुमची संपत्ती हडप करेल, अशी भीती घालत होते. या दोघांनी त्यांच्या प्रॉपर्टीसह बँकेचे सर्व महत्त्वाचे दस्तावेज कपाटात सुरक्षित ठेवतो असे सांगून त्यांच्याकडून त्यांच्या प्रॉपर्टीसह इतर महत्त्वाचे दस्तावेज स्वत:कडे ठेवले होते. तसेच मरेपर्यंत ते दोघेही त्यांचा सांभाळ करतील, असे आश्‍वासन दिले होते. त्यांच्या अज्ञानाचा तसेच चांगूलपणाचा फायदा घेऊन त्यांच्या बँकेत जास्त पैसे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आयकर विभागासह पोलिसांच्या कारवाईसह त्यांची बँकेतील कॅश जप्त होऊ शकते, अशी भीती घातली होती. त्यानंतर तो त्यांना बँकेत घेऊन गेला आणि तिथे वेगवेगळ्या कागदपत्रांवर त्यांची स्वाक्षरी घेतली होती. अशा प्रकारे त्याने त्यांच्या बँक खात्यातील सर्व कॅश, ठेवी, १२ तोळे सोने आणि ४० किलो चांदी आदी स्वत:च्या बँक खात्यात ट्रान्स्फर करून घेतले होते. त्यांच्या मालवणीतील फ्लॅटची विक्री केली. त्यातून त्याला २१ लाख ५० हजार रुपये मिळाले होते. मकदुमनगर, हैदराबाद येथील फ्लॅट विक्रीतून ३५ लाखांपैकी २३ लाख रुपये त्याने स्वत:कडे ठेवून घेतले होते. तसेच त्याने त्यांच्या नावाने पॉवर ऑफ ॲटर्नी बनवून त्यांची प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न केला होता. याकामी त्याला त्याची पत्नी पद्मा मदारीने मदत केली होती. याच दरम्यान त्यांचा मुलगा जोशवा हा आजारी असल्याचे समजताच ते अंधेरीतील फ्लॅटमध्ये जाण्यासाठी निघाले होते. मात्र या दोघांनी त्यांना तिथे जाऊ दिले नाही. त्यांना दम देऊन घरातच कोंडून ठेवले होते. मात्र संधी मिळताच ते शीव येथून अंधेरीतील राहत्या घरी आले. त्यांनी घडलेला प्रकार त्यांच्या मुलाला सांगितला. त्यानंतर त्यांनी तिन्ही बँकेत जाऊन चौकशी केली असता जेकब आणि पद्मा यांनी त्यांच्या बँकेचे सर्व पैसे त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केल्याचे दिसून आले. अशा प्रकारे या दोघांनी त्यांच्या सुमारे ९६ लाखांची प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न करून त्यांच्या पैशांचा अपहार केला होता. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांत या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी जेकब आणि पद्माविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. लवकरच ही प्रॉपर्टी पोलिसांकडून जप्त केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in