मुंबई : व्यावसायिक तसेच कौटुंबिक वादातून एका सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची बेल्टने गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार धारावी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अपहरणासह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या मोहम्मद नजीब वसीउल रेहमान शेख याला धारावी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अपहरण झालेल्या मुलाची पोलिसांनी सुटका करुन त्याचा ताबा त्याच्या पालकांकडे सोपविला आहे.
१० नोव्हेंबरला रात्री साडेदहा वाजता एका अज्ञात व्यक्तीने एका सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण केले होते. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी या मुलाचा शोध सुरू केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर हा मुलगा मोहम्मद नजीबसोबत जाताना दिसून आला होता. त्याचा शोध सुरू असताना या मुलाला विरार आरपीएफ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर काही वेळानंतर मोहम्मद नजीबला पोलिसांनी अटक केली. चौकशीत तो तक्रारदाराच्या परिचित असून, मुलाच्या वडिलांसोबत त्याचा व्यावसायिक आणि कौटुंबिक वाद होता. याच वादातून त्याने त्याच्या मुलाचे अपहरण करून त्याच्या हत्येची योजना बनविली होती. या मुलाला अज्ञात स्थळी नेऊन त्याने बेल्टने गळा आवळून त्याच्या हत्येचा प्रयत्न केला होता, असे तपासात उघडकीस आले आहे.